बारामती : वाहतूकीचे नियम मोडणा-यांविरुध्द आता नियमित कारवाई 

बारामती : वाहतूकीचे नियम मोडणा-यांविरुध्द आता नियमित कारवाई 

बारामती शहर - दुचाकी किंवा चारचाकी वाहनाला नंबरप्लेट नसताना वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट वापरणे, ट्रीपलसिट दुचाकी चालविणे बारामतीकरांना या पुढे महागात पडणार आहे. वाहतूकीचे नियम मोडणा-यांविरुध्द दररोज दोन सत्रात नियमित कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी दिली. 

बारामती शहर पोलिस ठाण्यातील सर्वच पोलिसांना या पुढील काळात कार्यालयीन कामकाज सुरु होण्याअगोदर दीड तास रस्त्यावर उभे राहून वाहतूकीला शिस्त लावण्याचे काम करण्याचे निर्देशच औदुंबर पाटील यांनी दिले आहेत. 

औदुंबर पाटील यांनी चार दिवसांपूर्वीच बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक म्हणून कार्यभार स्विकारला. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून नावलौकीक असलेल्या पाटील यांनी कामाचा धडाका सुरु केला. 

सर्वप्रथम त्यांनी पोलिस ठाणे व परिसराची स्वच्छता करवून घेतली. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून या पुढील काळात अस्वच्छता खपवून घेणार नाही असा संदेशच त्यांनी दिला. 

दरम्यान बारामती शहरातील बेशिस्त वाहतूक पाहून स्वताःच रस्त्यावर उतरुन नियमित कारवाईचा निर्णय घेत त्यांनी आजपासून या कारवाई सत्राला प्रारंभ केला. पहिल्याच दिवशी नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी, ट्रीपल सिट दुचाकी चालविणारे, मोबाईल बोलत गाडी चालविणा-यांसह फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांवरही त्यांनी कारवाई केली. बारामती भिगवण रस्त्यावर  चालकाशेजारी दोन प्रवासी बसवून वाहतूक करणा-या रिक्षाचालकांवरही कारवाई केली  गेली. 

दरम्यान आपण स्वताः व सर्व अधिकारी व कर्मचारी दररोज सकाळी व संध्याकाळी या कारवाईत सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी आज सांगितले. 
चौकट- विनानंबरप्लेटच्या गाड्यांवर होणार कारवाई नव्याने खरेदी केलेल्या विनानंबरप्लेटच्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याने जो पर्यंत नंबरप्लेट गाडीला बसविली जात नाही तो वर ती गाडी रस्त्यावर आणू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

मोबाईल बोलत गाडी चालवू नका...
मोबाईलवर बोलत दुचाकी चालविताना कोणीही सापडले तर त्यांच्याविरुध्द खटला भरुन त्यांना अटक करुन हा गुन्हा न्यायालयात पाठविणार असल्याचे औदुंबर पाटील यांनी स्पष्ट केले. स्वताःसोबत इतरांचाही जीव धोक्यात घालणा-या वाहनचालकांवर कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com