बारामती : गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास स्थानिकांचा विरोध

बारामती : गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास स्थानिकांचा विरोध

बारामती शहर - शहरातील अशोकनगर भागात नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. येथे नगरपालिकेने जबरदस्तीने हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. 

काल या भागातील रहिवाशांची बैठक झाली, त्यात आरोग्य निरिक्षक सुभाष नारखेडे यांच्यासमोरही स्थानिकांनी आपला विरोध स्पष्टपणे नोंदवत हा प्रकल्प अशोकनगरमध्ये होऊ देणार नसल्याचे सांगितले. ज्या जागेवर हा प्रकल्प उभारण्याचे काम नगरपालिकेने एका रात्रीत केले त्या जागेच्या मालकांनीही आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता हे काम सुरु केल्याचे नमूद केले. जागा नगरपालिकेकडे हस्तांतरीत केलेली असली तरी तेथे उद्यान विकसित करण्याचे नगरपालिकेतील ठरावाद्वारे निश्चित केले होते असे सांगितले. 

दरम्यान एका रात्रीत स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता अचानकच या प्रकल्पाचे काम सुरु केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे या भागातील स्थानिक नगरसेवकांनाही या बाबत कसलीच कल्पना देण्यात आली नव्हती, असेही पुढे आले आहे. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या घरापासून काही अंतरावरच हा प्रकल्प उभारला जात आहे. 
काल अशोकनगरमध्ये स्थानिक नागरिकांनी बैठक घेत या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पात आणून टाकल्या जाणा-या कच-यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो व निवासी भागात हा प्रकल्प उभारण्याऐवजी कचरा डेपो किंवा जेथे फार वस्ती नाही अशा ठिकाणी करावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. नगरपालिकेने जर या बाबत वेळीच उपाययोजना केली नाही तर स्थानिक नागरिक तीव्र आंदोलन उभारतील असा इशाराही या वेळी दिला गेला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com