बारामतीत दुचाकीच्या क्रमांकाची मंगळवारपासून नवीन मालिका 

मिलिंद संगई
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

बारामती येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 5 नोव्हेंबर रोजी दुचाकी खासगी वाहनांसाठी नवीन मालिका (MH 42 AZ) सुरू करण्यात येणार आहे.

बारामती शहर (पुणे) : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 5 नोव्हेंबर रोजी दुचाकी खासगी वाहनांसाठी नवीन मालिका (MH 42 AZ) सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील वाहन क्रमांकासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक व पसंतीचे क्रमांक हवे असतील, त्यांनी 5 नोव्हेंबर रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान अर्ज शुल्क रक्कमेच्या "डीडी'सह जमा करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे.

एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या नंबरचे बंद पाकीट लिलाव पद्धतीने वाटप केले जाईल. एकदा आरक्षित ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही.

आरक्षित ठेवलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही; तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही, अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati RTO's new two-wheeler series from November 6