Pune : बारामतीकरांनी इतिहास अनुभवला याची देहा याची डोळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati Sharadotsav 2022

Pune : बारामतीकरांनी इतिहास अनुभवला याची देहा याची डोळा

बारामती : अगदी रामायणा पासून ते देश स्वतंत्र होईपर्यंत आणि त्यानंतरही अगदी कारगिल युध्दापर्यंतचा सर्व इतिहास बारामतीकरांनी अडीच तासात याची देहा याची डोळा अनुभवला..... पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने आयोजित शारदोत्सव 2022 मध्ये अशोक हांडे व त्यांच्या 150 सहकलाकारांनी शनिवारी (ता. 22) बारामतीच्या गदिमा सभागृहात आजादी 75 हा सुंदर कार्यक्रम सादर केला. रामायणापासून ते कारगिल युध्दापर्यंतचा इतिहास ध्वनीचित्रफितीसह, गाणी, नृत्य व प्रहसनातून अशोक हांडी यांनी बारामतीकरांसमोर उलगडला.

दरवर्षी दिवाळी निमित्त पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने शारदोत्सवाचे दोन दिवस आयोजन केले जाते. यंदा अशोक हांडे यांच्या आजादी 75 या कार्यक्रमाने शारदोत्सवाचा प्रारंभ झाला.

रामायणापासून या इतिहासाचा प्रारंभ झाला, गौतम बुध्दांचे तत्वज्ञान, त्या नंतर सिकंदर, अल्लाउद्दीन खिलजी, मेवाडवरचे आक्रमण, त्या नंतर अकबर बादशहाचा उदय, मुगल साम्राज्याचा उदय, त्या नंतर जहांगिराची कारकिर्द, त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय, हिंदवी स्वराज्याची स्थापना त्या नंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या नंतर पेशवाईचा उदय, त्या नंतर आलेल इंग्रजांच राज्य, झाशीची राणी लक्ष्मीबाई, 1857 चे बंड, त्या नंतर मंगल पांडे, भगतसिंह, राजगुरु सुखदेव यांचे बलिदान, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान, त्या नंतर भारत व पाकिस्तानची झालेली फाळणी, त्या नंतर अगदी कारगिलपर्यंतचा प्रवास गीते, नृत्य, प्रहसन व दृकश्राव्य माध्यमातून बारामतीकरांपर्यंत उभा राहिला.

खासदार सुप्रिया सुळे, विद्या प्रतिष्ठाचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, विश्वस्त किरण गुजर व अश्विनी पवार कार्तिकीयेन यांनी स्वागत केले. जुन्नर परिसरात शेतकरी कुटुंबातून आलेल्या अशोक हांडे यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कार्यक्रमानंतर प्रशंसा केली. त्यांनी उभा केलेला हा इतिहास बारामतीकर कायम स्मरणात ठेवतील, असे ते म्हणाले.

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, प्रतिभाताई पवार यांच्यासह पवार कुटुंबिय व बारामतीकर मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

टॅग्स :Pune NewsBaramatiTheater