बारामती एसटी आगार दुरावस्थेत

मिलिंद संगई
रविवार, 1 जुलै 2018

या विश्रांतीगृहानजिकच्या अस्वच्छतेने येथे डासांची साम्राज्य असते, त्यातच चालक वाहकांना विश्रांती घ्यावी लागते. या विश्रांतीगृहाची स्वच्छता केली जात नाही, येथे पुरेसा प्रकाश नाही किंवा खेळती हवाही नाही.

बारामती शहर - शहरातील राज्य परिवहन मंडळाच्या आगारात वाहक व चालकांना कसल्याच सुविधा मिळत नसल्याने त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

पुणे जिल्ह्यातील एसटीचे एक मोठे आगार म्हणून बारामतीचा नावलौकीक आहे. येथे काही गाड्या मुक्कामी असतात तर दोन गाडया सुटण्याच्या कालावधीत काही चालक वाहक आगारातील विश्रांतीगृहात विश्रांती घेतात. मात्र हे विश्रांतीगृह एखाद्या कोंडवाड्याप्रमाणे आहे. तेथे चालकांना ना विश्रांती घेण्याची सुविधा आहे, ना जेवणाचा डबा खाण्याची. जमिनीवर चटई अंथरुन चालक वाहक त्यावरच झोपतात व तेथेच मांडी घालून डबा खातात. इतकेच नाही तर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी घाणेरड्या टाकीतील पाण्याचा वापर करावा लागतो. पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ कमालीची अस्वच्छता असते. 

या विश्रांतीगृहानजिकच्या अस्वच्छतेने येथे डासांची साम्राज्य असते, त्यातच चालक वाहकांना विश्रांती घ्यावी लागते. या विश्रांतीगृहाची स्वच्छता केली जात नाही, येथे पुरेसा प्रकाश नाही किंवा खेळती हवाही नाही. एखाद्या कारागृहातील कैदयांना ज्या प्रमाणे वातावरण असते तसेच वातावरण येथे आहे. 

या चालक वाहकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहात सामान्य माणूस प्रवेशच करु शकणार नाही इतकी टोकाची दुर्गंधी असते, पण दुसरा पर्यायच नसल्याने नाईलाजाने चालक वाहक याच स्वच्छतागृहाचा नाइलाजाने वापर करतात. प्रवाशांना घेऊन सुरक्षितपणे त्यांच्या गावाला सोडण्याचे काम प्रामाणिकपणे करणा-या एसटीच्या चालकांसह वाहकांना ज्या वातावरणात विश्रांती घ्यावी लागते ते भयानक आहे. 

बारामतीत इतर सर्व प्रशासकीय इमारतींसह कार्यालयांचा कायापालट झाला खरा पण एसटीच्या या इमारतीकडे मात्र सातत्याने दुर्लक्षच झाले. विश्रांतीगृहासह एसटी कर्मचारी वसाहतीचेही नूतनीकरण करुन अधिकाधिक चालक वाहकांना तेथे घरे मिळाली तर त्यांचा जाण्या येण्याचा वेळ वाचू शकतो अशी भावना काही चालक वाहकांनी बोलून दाखविली. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Baramati ST Depot is in bad condition