राज्य परिवहन मंडळाच्या आगारात बारामतीकरांचा मनस्ताप

मिलिंद संगई
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

बारामती आगारात सध्या 96 गाड्या असून 223 चालक व 170 वाहक उपस्थित असतात. बारामती आगाराची एकूण गरज विचारात घेता दररोज किमान 20 चालक व 25 वाहकांना डबलड्यूटी करावीच लागते अन्यथा एसटीचे वेळापत्रकच कोलमडून जाईल, अशी स्थिती आहे. 

बारामती शहर - येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारामधील बस गाड्या तसेच चालक वाहकांच्या कमतरतेमुळे बारामतीकरांना दररोज कमालीच्या मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. दरवर्षी सातत्याने बारामती आगार नफ्यात असतानाही बारामतीला गाड्या व कर्मचारी वाढवून दिले जात नसल्याने लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.

सणांचे तसेच शनिवार, रविवार व सोमवारी बारामती बसस्थानकावर प्रचंड गर्दी असते. बारामती-पुणे-बारामती या मार्गावर सर्वाधिक प्रवाशांचा ताण असतो. जोडून आलेल्या सुट्यांच्या काळात, आषाढी एकादशी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, नाताळ व उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात बारामती आगारावर प्रचंड ताण असतो. 

बारामती आगारात सध्या 96 गाड्या असून 223 चालक व 170 वाहक उपस्थित असतात. बारामती आगाराची एकूण गरज विचारात घेता दररोज किमान 20 चालक व 25 वाहकांना डबलड्यूटी करावीच लागते अन्यथा एसटीचे वेळापत्रकच कोलमडून जाईल, अशी स्थिती आहे. 

बारामती आगाराचा विचार केल्यास यंदाच्या वर्षी बारामती आगाराने तब्बल 11770 विद्यार्थी पासेस वितरीत केलेले आहेत. याचाच अर्थ बारामतीच्या एसटीने दररोज किमान 11 हजार विद्यार्थी विविध मार्गांवर प्रवास करीत असतात. विद्यार्थ्यांच्या शाळा महाविद्यालयांचे वेळापत्रक पाहता विद्यार्थी वाहतूकीसाठी बसेसची संख्या अत्यंत अपुरी असून त्याचा प्रचंड मनस्ताप विद्यार्थी दररोज सहन करतात. अनेकदा आंदोलन केली जातात, कधी कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. 

बारामती-पुणे-बारामती मार्गावर दररोज 59 फे-या होतात, यात 33 फेऱ्या साध्या गाडीच्या तर 26 फेऱ्या शिवशाही गाडीच्या होतात, तरीही या मार्गावर सातत्याने प्रवाशांना गाडीची प्रतिक्षा करावी लागते. दर पंधरा मिनिटांनी पुण्यासाठी गाडी सोडूनही प्रवाशांचा रांगा कमी होत नसल्याने मोठा प्रश्न एसटीपुढे निर्माण झाला आहे. 

फेरबदलाची नितांत गरज -
बारामती आगाराला नवीन किमान 15 अतिरिक्त गाड्या व प्रत्येकी 30 चालक वाहक दिले गेले, तरच या आगाराचे कामकाज काही प्रमाणात सुरळीत होईल अशी स्थिती आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या बसेसची संख्या वाढविण्याखेरीज पर्यायच नाही. वरिष्ठ पातळीवरुन या प्रश्नाचा व्यापक आढावा घेऊन प्रवाशांना दिलासा देण्यासाठी फेरबदल नितांत गरजेचे आहेत. 

 

Web Title: Baramatis people irritate at State Transport Board