कात्रज येथे वाहतूक पोलिसांनी लावलेले बॅरिकेड त्यांनीच हटविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार पीएमपीच्या कात्रज स्थानकावर लावण्यात आलेले १५ लोखंडी बॅरिकेड वाहतूक पोलिसांनीच बुधवारी उचलून नेले. यामुळे पीएमपीचे अधिकारी अचंबित झाले. मात्र, वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पुणे - वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार पीएमपीच्या कात्रज स्थानकावर लावण्यात आलेले १५ लोखंडी बॅरिकेड वाहतूक पोलिसांनीच बुधवारी उचलून नेले. यामुळे पीएमपीचे अधिकारी अचंबित झाले. मात्र, वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीएमपीच्या कात्रज चौकात तीव्र उतारामुळे वारंवार अपघात होतात. या चौकातच पीएमपीचे स्थानक आहे. सुमारे दीड लाख प्रवासी दररोज या स्थानकावरून ये-जा करतात. संतोषनगर, आंबेगाव, भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुर्जरवाडी आदी परिसरातून कात्रजकडे येणारे दुचाकीचालक अनेकदा पीएमपी स्थानकाच्या आवारात उभ्या राहिलेल्या बसच्या आजूबाजूने जातात. त्यामुळे स्थानकावर अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. 

वाहतूक शाखेतील तत्कालीन उपायुक्त प्रवीण मुंडे, पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी या चौकाचा सखोल अभ्यास केला. त्यानुसार पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी बसच्या बाजूला लोखंडी बॅरिकेड लावावेत, अशी सूचनाही केली. त्यानुसार पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी 

लोखंडी बॅरिकेड लावली होती. मात्र, वाहतूक पोलिस निरीक्षक एस. पुराणिक यांनी महापालिकेच्या मदतीने १५ लोखंडी बॅरिकेड उचलून नेले.  त्यामुळे ‘नवा गडी, नवा राज’चा अनुभव  पीएमपी अधिकाऱ्यांना आला.

वाहतुकीला अडथळा होतो म्हणून बॅरिकेड काढले आहेत. कात्रज चौकात वाहतूक सुरळीत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ही कारवाई झाली. आता चौक मोकळा झाला असून, कोंडीही सुटली आहे.
- संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त

पोलिसांच्या आदेशानुसार  बॅरिकेड लावली होती. ती उचलण्यापूर्वी कोणत्याही अधिकाऱ्याशी पोलिसांनी संवाद साधलेला नाही. एकतर्फी कारवाई करून काय साध्य होणार आहे? या कारवाईमुळे कात्रज स्थानक वाहतुकीसाठी आणखी असुरक्षित झाले आहे.
- अनंत वाघमारे, महाव्यवस्थापक, पीएमपी

अवैध वाहतुकीकडे काणाडोळा 
कात्रजमध्येच खासगी प्रवासी बसला भल्या पहाटे ‘जॅमर’ लावणाऱ्या वाहतूक पोलिसांचे या चौकातून होत असलेल्या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे. कात्रज चौक ते नवले उड्डाण पूल, कात्रज चौक-गोकूळनगर, कात्रज-कोंढवा, कात्रज-खेड शिवापूर आदी मार्गांवर या चौकातून अवैध प्रवासी वाहतूक होते. त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जातात, असे सर्रास दिसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The barricades were removed by the traffic police at Katraj