निराधार वृद्धेला मिळाला आधार

गणेश बोरुडे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

तळेगाव स्टेशन - रेल्वे स्टेशन समोरील एसटी बस स्थानकानजीक गेल्या काही दिवसांपासून निराधार स्थितीत उघड्यावर राहत असलेल्या तानाबाई पालव या ७० वर्षीय महिलेला समाजसेवींच्या जागरूकतेमुळे अखेर अहिरवडे (कामशेत) येथील किनारा वृद्धाश्रमाचा आसरा मिळाला आहे.

तळेगाव स्टेशन - रेल्वे स्टेशन समोरील एसटी बस स्थानकानजीक गेल्या काही दिवसांपासून निराधार स्थितीत उघड्यावर राहत असलेल्या तानाबाई पालव या ७० वर्षीय महिलेला समाजसेवींच्या जागरूकतेमुळे अखेर अहिरवडे (कामशेत) येथील किनारा वृद्धाश्रमाचा आसरा मिळाला आहे.

गेले काही महिने एक वृद्धा एसटी बस स्थानकाजवळील मारुती मंदिरालगत भिंतीचा आसरा घेऊन उघड्यावरच राहत होती. रात्री अपरात्री मद्यपी त्यांची खोड काढून खिजवत असत. बरेच दिवस निरीक्षण केल्यानंतर वृद्धेची ही अवस्था पाहून एकनाथ बुळे यांनी या संदर्भात वृद्धेला आधाराची गरज असल्याची एक पोस्ट फेसबुकवर टाकली. फेसबुकवरची व्यथा वाचल्यावर सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी कामशेतजवळील अहिरवडे येथील किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य यांना या संदर्भात फोन केला.

त्यानुसार मंगळवारी (ता.१३) किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य आणि शैलेश भिडे यांनी मंगळवारी तळेगाव स्टेशनला येऊन वृद्धेचे निरीक्षण आणि पाहणी करून तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे महेंद्र रावते, विनोद पाटोळे यांच्या संमतीने सामाजिक कार्यकर्ते पल्लवी मुरुडकर, राहुल सायकर, नरेश अगरवाल, संगीता गव्हाणे आदींच्या मदतीने किनारा वृद्धाश्रमात आणले. तिकडे व्यवस्थित स्वच्छता करून नीटनेटके कपडे परिधान केल्यानंतर तानाबाईंचा चेहरा खुलला. दरम्यान त्यांना विश्वासात घेऊन आपुलकीने विचारले असता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्‍यातील मूळच्या खोटले गावच्या असलेल्या तानाबाई मुले सांभाळत नसल्याने गाव सोडून भरकटत आल्या. त्यानंतर त्या बऱ्याच वर्षांपासून शेलारवाडीतील एका मोडकळीस आलेल्या निर्जन वाड्यात वास्तव्य करून धुणी-भांडी करून जीवन जगत होत्या. दरम्यान वार्ध्यक्‍यामुळे आलेली दुर्बलता आणि स्मृतिभंशामुळे त्या भरकटत तळेगावला आल्या असाव्यात, असा अंदाज आहे. दोन मुले दोन मुली असूनही कुणीही त्यांचा सांभाळ करीत नसल्याचे त्या सांगतात. याच संदर्भाने तिकडे चौकशी केली असता कुणीही ओळख दाखविली नसल्याचे वैद्य म्हणाल्या. यामुळे तानाबाईला आता कायमस्वरूपी किनारा वृद्धाश्रमात ठेवण्यात येणार आहे. दिशाहीन भरकटणाऱ्या तानाबाईला वृद्धाश्रमात कोंडल्यासारखे होत असले, तरी लवकरच समुपदेशनाद्वारे त्यांना डॉक्‍टरांच्या सल्ल्याने स्थिर करू, असा आशावाद वैद्य यांनी व्यक्त केला.

Web Title: Baseless Old Women Tanabai Palav Old Age Home Support Humanity