पायाभूत चाचणीत सावळा गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पिंपरी - प्रश्‍नपत्रिका अपुऱ्या आल्यामुळे, पायाभूत चाचणी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी अनेक शाळांमध्ये दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गोंधळाला सामोरे जावे लागले. विशेषतः सेमी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये ही परिस्थिती उद्‌भवली. काही शाळांमध्ये प्रश्‍नपत्रिकेच्या छायांकित प्रती काढून उशिरा परीक्षा सुरू केल्या, तर एक-दोन शाळांवर परीक्षेचा पेपरच पुढे ढकलण्याची वेळ आली. 

पिंपरी - प्रश्‍नपत्रिका अपुऱ्या आल्यामुळे, पायाभूत चाचणी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी अनेक शाळांमध्ये दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गोंधळाला सामोरे जावे लागले. विशेषतः सेमी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये ही परिस्थिती उद्‌भवली. काही शाळांमध्ये प्रश्‍नपत्रिकेच्या छायांकित प्रती काढून उशिरा परीक्षा सुरू केल्या, तर एक-दोन शाळांवर परीक्षेचा पेपरच पुढे ढकलण्याची वेळ आली. 

पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित विषयांचा सराव होण्यासाठी सरकारच्या शिक्षण विभागाने गेल्या वर्षीपासून पायाभूत चाचणी परीक्षा सुरू केल्या. राज्यभरातील शाळांसाठी समान वेळापत्रक जाहीर करून यंदाची परीक्षा मंगळवारपासून सुरू करण्यात आली. परीक्षांची घोषणा केली, तरी शिक्षण विभागाने त्याबाबतची पुरेशी तयारी केली नसल्याचे स्पष्ट झाले. शाळांमध्ये पहिल्याच दिवशी भाषा विषयासाठी पुरेशा प्रश्‍नपत्रिकाच वेळेत पोचल्या नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अनेक शाळांना प्रश्नपत्रिकांसाठी धावपळ करावी लागली. 

शहरातील राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या 426 शाळांमधील दोन लाख 29 हजार 226 विद्यार्थी आहेत. त्या तुलनेत जिल्हा परिषदेकडून एक लाख 12 हजार प्रश्‍नपत्रिकाच मिळाल्या. गेल्या वर्षीही नियोजनाचा बोजवारा उडाला होता. यंदाही त्यात सुधारणा झाली नाही. सेमी इंग्रजी, हिंदी, उर्दू माध्यमांच्या शाळांच्या परीक्षेबाबत, तर शिक्षण विभागाकडेच शाळा, विद्यार्थी संख्या यांचीच पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. शाळा, त्यातील नेमके विद्यार्थी याची अद्ययावत माहितीच नसल्यामुळे, प्रश्नपत्रिकांचा तुटवडा झाला. पेपरफुटीसारख्या घटना टाळण्यासाठी प्रश्‍नपत्रिकेच्या छायांकित प्रती काढू नयेत, अशी सरकारची स्पष्ट सूचना असतानाही काही शाळांवर प्रश्‍नपत्रिकेच्या छायांकित प्रती काढण्याची वेळ आली. शिक्षण मंडळाचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांच्याशी संवाद साधल्यावर ही गोष्ट स्पष्ट झाली. 

प्रश्नपत्रिकांची संख्या पुरेशी नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी शाळांजवळील दुकानांतून प्रश्‍नपत्रिकेच्या छायांकीत प्रती काढण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे शाळांकडून सांगण्यात आले. 

पायाभूत चाचणी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका कमी पडणे, हा अनुभव शाळांना सध्या येत आहे. त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारही केली आहे. प्रश्‍नपत्रिका कमी असल्याने त्याची प्रत काढावी लागते. मात्र, त्यात काही गैरप्रकार झाला, तर त्याला सर्वस्वी मुख्याध्यापकांना जबाबदार ठरविले जाते. तरी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. 
-राधेश्‍याम मिश्रा, प्राचार्य, श्रीमती गोदावरी हायस्कूल 

काही शाळांमध्ये प्रश्‍नपत्रिका अपुऱ्या पुरविल्या गेल्याच्या तक्रारी आहेत. तेथे परीक्षा उशिरा सुरू झाल्या. त्याचा आढावा घेण्यात येत आहे. बुधवारपासून तेथे पुरेशा प्रश्‍नपत्रिका पोचविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. 
- पराग मुंढे, सहायक प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ. 

Web Title: basic test exam issue