'उच्चशिक्षित मुलींनी खेड्यांत काम करावे'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

कोथरूड -  ""कुटुंबाने एकत्रित येऊन सामाजिक काम करावे. समाज अजूनही खूप मागे असून, तो पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. उच्चशिक्षित मुलींनी खेड्यांत जाऊन काम करणे गरजेचे आहे. व्यवसाय हा पैशासाठी नसतो, तो समाजाचे ऋण फेडण्यासाठी असतो,'' असे मत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रेणू दांडेकर यांनी व्यक्त केले. 

महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा बाया कर्वे पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा गोखले यांना दांडेकर यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी दांडेकर बोलत होत्या. संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, उपकार्याध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, विद्या देशपांडे, डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, अनघा लवळेकर, संजय तांबट आदी उपस्थित होते. 

डॉ. दांडेकर म्हणाल्या, ""सध्याच्या मुलांच्या हातामध्ये बळ व कौशल्य देणे ही समाजाची जबाबदारी आहे. कुटुंबव्यवस्था संपत चालली असताना संपूर्ण कुटुंब एका विचाराने पुढे जाणे गरजेचे आहे. सध्याच्या मुलींनी उघड्या डोळ्याने जग बघितल्यास या संस्थेतील प्रत्येक मुलगी बाया कर्वे बनेल. समाजातील चांगल्या घटना मुलींपर्यंत पोचणे गरजेचे आहे.'' 

गोखले म्हणाल्या, ""महिलांसाठी काम केल्याने खूप आनंद वाटतो. महिलांच्या प्रश्‍नासंबंधी महिलांमध्ये जाणीवजागृती निर्माण करणे आवश्‍यक असून, महिलांनीही सामाजिक कार्याची आवड निर्माण करावी. बचत गटातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळते. हा पुरस्कार माझा नसून, प्रबोधनी संस्थेतील सगळ्या महिलांचा आहे.'' 

Web Title: baya karve award