रस पिताना राहा सावधान!

डॉ. संजय ललवाणी, डॉ. अमृता वाळिंबे
बुधवार, 27 जून 2018

पुण्यात दुधी भोपळ्याचा रस पिऊन महिलेचा मृत्यू, अशी बातमी वाचली. ‘मॉर्निंग वॉक’ला गेल्यावर असंख्य व्यक्ती बाहेर मिळणारे भाज्यांचे किंवा औषधी रस पितात; पण खरंच ते लाभदायी आहेत का, याबद्दलचा हा लेख.

सामान्यपणे दुधी भोपळा, गव्हांकुर, तुळस, कारले, जांभूळ, आलं, कडुलिंब, लिंबू, गाजर, बीट, आवळा इत्यादी रस सगळीकडे मिळतात. या प्रत्येक रसामध्ये विविध औषधी घटक आढळतात. पण, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशा यालाही आहेत. कधीकधी आरोग्यदायी रसही घातक ठरू शकतात. प्रत्येक माणसाची प्रकृती वेगवेगळी असते. एखाद्याला एका रसाने फायदा झाला म्हणजे दुसऱ्याला होईलच असे नाही. 

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने २०१० मध्ये तज्ज्ञांची एक विशेष समिती स्थापन केली होती. ‘भाजीपाल्याच्या, विशेषतः दुधी भोपळ्याच्या रसाची सुरक्षितता हाच या समितीच्या संशोधनाचा विषय होता. याआधीही भोपळ्याचा रस प्यायल्यानंतर मृत्यूच्या काही घटना देशभरात घडल्या होत्या. दुधी भोपळा, काकडी, कलिंगड, टरबूज आदींमध्ये टेट्रासायक्‍लिक ट्रिटरपिनॉईड क्‍युकरबिटॅसिन नावाचे रासायनिक मूलद्रव्य असते, जे त्याची चव तुरट किंवा कडवट बनवते व शरीराला दुष्परिणाम निर्माण करू शकते. यामुळे उलट्या, जुलाब होऊन जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या समितीने दुधीचा रस कडू लागल्यास तो पिऊ नये,’ असे सांगितले आहे. रस करताना त्यातील फायबर म्हणजेच चोथा फेकून दिल्यामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते. जांभळाचा किंवा कारल्याचा रस प्यायल्यामुळे रक्तातील साखर तात्पुरती कमी होते; पण ते मधुमेह पूर्णपणे बरा करत नाहीत.

खालील गोष्टी लक्षात ठेवा ः

१) भाज्या व फळे ताजी असावीत. ती व्यवस्थित धुवून घ्यावीत. २) दुधी भोपळा, काकडी कायम कोवळा असावा. रस कडवट लागल्यास पिऊ नये. ३) रस विकणारे रस आंबट किंवा तुरट झाल्यास साखर घालतात. त्यामुळे रस खराब झाल्याचे कळत नाही व दुष्परिणाम होऊ शकतात. ४) स्वतः घरी रस करून पिणे जास्त उत्तम. दुधी भोपळा किंवा काकडीचा तुकडा चाखून बघावा. तो कडू लागल्यास वापरू नये. ५) रस बनविताना बिया दळल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ६) तयार केलेला रस १-२ तासांत संपवावा. ७) एका रसात दुसरा रस मिसळू नये. ते घातक ठरू शकते. ८) रसापेक्षा ताजी कापलेली फळे व सॅलड खावे. ९) गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्‍टरांना न विचारता असे रस घेऊ नयेत.

भाज्या फळे सर्वांसाठी वरदान, रस पिताना मात्र राहा सावधान!

Web Title: Be careful to drink juice Bottle Gourd JUICE