कात्रज घाटात जाताय..? सावधान!

कात्रज घाटात जाताय..? सावधान!

पुणे - पुणे-सातारा रस्त्यावरील समस्या काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीत. मुदतवाढ देऊनही महामार्गाचे रुंदीकरण अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यातच जुन्या कात्रज बोगद्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, त्याचा राडारोडा रस्त्यालगतच्या चारीत पडलेला आहे; तसेच पावसाळ्यात काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. शिंदेवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.    

पुणे शहरातून सातारा, कोल्हापूर आणि कोकणाकडे बहुतांश प्रवासी जुन्या कात्रज घाटातून जातात. राज्य परिवहन महामंडळ आणि ‘पीएमपी’च्या बस याच मार्गाने ये-जा करतात. भोर, वेल्ह्यातील नागरिकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरू पाहत आहे. कारण, घाट सुरू होताच प्रत्येक वळणावर राडारोड्याचे ढीग दिसतात. ते कित्येक महिन्यांपासून तसेच आहेत. त्यामुळे हा कात्रजचा घाट की डंपिंग ग्राउंड, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्यात डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्याला त्याचा अडथळा ठरू शकतो. ते पाणी रस्त्यावरून वाहत आल्यास अपघात घडू शकतो.

भोरकडून पुण्याकडे येताना जुना बोगदा संपताच पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. त्या दरडींचा राडारोडा पाणी वाहून जाण्यासाठी काढण्यात आलेल्या रस्त्यालगतच्या चारीत पडलेला आहे. याशिवाय घाटातील बंद असलेल्या ‘चेक पोस्ट’पर्यंत ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. काही ठिकाणी मोठमोठे दगड केवळ झाडांच्या मुळ्यांमुळे अडकून राहिलेले आहेत, कधीही खाली पडू शकतात. रस्ता अरुंद असल्याने या वेळी रस्त्यावर वाहने असल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.

...अन्यथा ‘शिंदेवाडी’ होण्याचा धोका 
वास्तविक पाहता, शिंदेवाडी येथे सहा जून २०१३ रोजी झालेल्या दुर्घटनेतून बोध घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या कात्रज बोगद्यात वेळीच उपाययोजना करायला हव्यात; पण जिथं रस्त्यालगतचा राडारोडाच उचलला जात नाही, त्या ठिकाणी धोकादायक दरडी हटवून प्रवासासाठी ‘निर्धोक घाट’ अशी अपेक्षा बांधकाम विभागाकडून कशी ठेवायची, असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

द्रुतगतीप्रमाणे उपाययोजना हव्यात
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढणे व विविध उपाययोजना कायम सुरू असतात. त्या मार्गावर ज्याप्रमाणे प्रवाशांची सुरक्षा पाहिले जाते, त्याचप्रमाणे जुन्या कात्रज बोगद्यातून जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी या धोकादायक दरडी हटविण्याची गरज आहे.

कात्रज जुन्या घाटातील धोकादायक दरडी काढण्यासाठीचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती निवारण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्या प्रस्तावास अजून मंजुरी मिळालेली नाही. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास या दरडीसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येईल. 
- नकुल रणसिंग,  सहायक अभियंता,  सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रेणी १

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com