सर्वांप्रती मैत्रीभाव बाळगा - शिवमुनीजी

सर्वांप्रती मैत्रीभाव बाळगा - शिवमुनीजी

पुणे - विश्‍वातील प्रत्येक प्राणिमात्राबद्दल मैत्रीभाव बाळगण्याची शिकवण आपल्याला भगवान महावीर यांनी दिली आहे. तसे झाल्यास आपल्या कुटुंबापासून जागतिक पातळीपर्यंत शांतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आचार्य शिवमुनीजी महाराज यांनी गुरुवारी येथे केले.

आचार्य शिवमुनीजी महाराज, युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज, प्रवर्तक प्रकाशमुनीजी यांच्यासह १६ संतांच्या चातुर्मासाचे आयोजन श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक सकल संघाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने संतवृंदाच्या मंगल प्रवेश समारंभात प्रवचन देताना ते बोलत होते. या वेळी उपप्रवर्तक अक्षयऋषीजी, प्रमुख मंत्री शिरीषमुनीजी, विशालऋषीजी, शुभममुनीजी, शमितमुनीजी, हितेन्द्रऋषीजी, निशान्तमुनीजी, अमृतऋषीजी, दर्शनमुनीजी, शाश्वतमुनीजी, शुद्धेशमुनीजी, शौर्यमुनीजी यांच्यासह उपाध्याय रवींद्रमुनीजी, साध्वी चारुप्रग्याजी, वैभवश्रीजी महाराज उपस्थित होते. 

आचार्य शिवमुनीजी महाराज म्हणाले की, मैत्रीभाव आत्मसात करण्यासाठी तपश्‍चर्या, ध्यान, करुणा हे गुण असणे आवश्‍यक आहे. त्याचे प्रात्यक्षिक तुम्हाला या चातुर्मासात मिळेल. रवींद्रमुनीजी म्हणाले की, प्रत्यक्षात आचार्यांचेच येथे वास्तव्य असल्यामुळे समाजाची उत्तम बांधणी करण्यासाठी या संधीचा फायदा घ्या. तर, प्रकाशमुनीजी म्हणाले की, चंद्राच्या ज्याप्रमाणे १६ कला असतात त्याचप्रमाणे १६ संत तुम्हाला जीवनाचा प्रकाश दाखविण्यासाठी येथे आले आहेत. 

तत्पूर्वी, सकाळी मार्केट यार्ड येथून शिवाचार्य समवसरणपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. शहरातील ३२ संघांचे रथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच अनेक महिला मंडळे, युवा ग्रुप सहभागी झाले होते. सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले होते. या मार्गावरील चौका-चौकांत मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत होते. प्रवचनाला, लोकप्रतिनीधींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयकांत कोठारी, प्रकाश धारिवाल, पोपटलाल ओस्तवाल, विजय भंडारी, राजेश सांकला, लखीचंद खिंवसरा, कचरदास पोरवाल, अरूण शिंगवी, वालचंद संचेती आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

आचार्य शिवमुनीजींच्या रूपाने एका ऊर्जावान माहात्म्याचा सहवास तुम्हाला मिळणार आहे. त्यांच्या माध्यमातून तुम्ही आयुष्याची बॅटरी चार्ज करून घ्या. त्याचा तुम्हाला आयुष्यभर उपयोग होईल, विविध समस्यांचा सामना तुम्ही करू शकाल.
- युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com