मदत मागणाऱ्यालाच खाकी वर्दीकडून बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

या प्रकाराबाबत माहिती घेत आहे. या घटनेची चौकशी करून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
- राजेंद्र मोहिते, वरिष्ठ निरीक्षक, समर्थ पोलिस ठाणे

पुणे - ‘‘साहेब, आयुष्यात काहीही अडचण आली तरी या पुढे मी पोलिसांना फोन करणार नाही... ज्यांना मदत मागितली त्याच पोलिसांनी खोलीचं दार बंद करून मला बेदम मारलं... न्याय मागायला गेल्यानंतर खोलीत कोंडून त्या हवालदारानं अन् आणखी एका पोलिसानं मला खूप जबर मारलं, हात आणि पाठ सुजलीय... मी गुन्हेगार आहे का?... पोलिसच तक्रार करणाऱ्यावर अन्याय करीत असतील, तर न्याय कोणाकडं मागायचा? ’’

हा आर्त टाहो आहे एका भयभीत नागरिकाचा.  त्यामुळे प्रश्‍न उभा राहिला पुणेकरांना सुरक्षिततेची हमी देणाऱ्या पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला या नागरिकाला न्याय देणार का ?

समर्थ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे मायकेल साठे खूपच भेदरलेल्या अवस्थेत होते. या घटनेनंतर त्यांनी थेट ‘सकाळ’ कार्यालय गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यातून उघड होत गेला पोलिसांचा बेमुर्वतखोरपणा, कायदा हाती असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हुकूमशाहीने वागविण्याची, थेट मारहाण करण्याची वृत्ती. 

रास्ता पेठेतील शशिकांत डेअरीसमोर मंगळवार घडलेली ही घटना. एका जुन्या दुचाकी विक्रेत्याकडून रस्त्याच्या कडेला वाहने लावली जात असल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची साठे यांची तक्रार होती. त्यांनी त्या विक्रेत्याला त्याबाबत विचारले. त्यातून वाद सुरू झाला. त्यातून साठे यांनी पोलिस नियंत्रण कक्षात १०० नंबरला फोन केला. पोलिसांना ते म्हणाले, ‘‘ताबडतोब या, आठ-दहा गुंड मला आणि माझ्या बायकोला मारताहेत.’’ परंतु पोलिस येण्याची चिन्हे दिसेनात. म्हणून त्यांनी पुन्हा फोन केला. नियंत्रण कक्षातल्या महिला कर्मचाऱ्याने ‘‘तुमचा नंबर सांगा’’, अशी विचारणा केली. त्यावर ‘‘मॅडम, मी बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. लवकर पोलिस पाठवून द्या’’, अशी त्यांनी विनवणी केली. 

‘‘तोपर्यंत तेथील काही लोकांनी आम्हा पती-पत्नीला मारहाण करण्यास सुरवात केली होती,’’ साठे सांगत होते. ‘‘त्या लोकांनी मला लोळवून-लोळवून मारलं. मग काही वेळाने पोलिस बीट मार्शल आले. पोलिसांसमोर मला मारहाण होत होती. ती त्यांनी थांबवली आणि पोलिस चौकीत चलण्यास सांगितले. मलाही त्यांनी दुचाकीवर मागे बसण्यास सांगितले. पोलिस असतानाही काही महिला माझ्या पत्नीच्या अंगावर गेल्या. ते पाहून मी ज्या पोलिसाच्या दुचाकीवर मागे बसलो होतो. त्या गाडीवरून खाली उतरलो. दुसरा पोलिस कर्मचारीही पुन्हा भांडण सोडविण्यास आला. दोन्ही पोलिसांनी त्या महिलांना थांबविले, परंतु ते लोक बरेच होते. ते आमच्या अंगावर धावून येत होते. त्यामुळे घाबरून मी पत्नीला त्या पोलिसांच्या मोटारसायकलवर बसवून ती समोरच असलेल्या समर्थ पोलिस ठाण्यात नेली. तेवढ्यात ते पोलिसही पाठीमागून आले. त्या पोलिसांनी माझ्या पत्नीला  बाहेर जमिनीवर बसविले. माझी गचांडी धरून खोलीत नेले. खोलीचा दरवाजा बंद करून काठी बाहेर काढली. ‘हात लांब कर...’ असे त्यांनी मला फर्मावले.  त्यावर मी विचारले ‘काय झालं साहेब?, मीच १०० नंबरला फोन केला होता,’’ मात्र, माझे काहीही न ऐकता मला अर्वाच्य शिवीगाळ केली अन धपाधप मारहाण सुरू केली. ‘‘आम्ही तुला सोडवायला आलो. आमचीच गाडी पळवून नेतो. तू गाडी चोरी केली आहे. माझी ड्यूटी घालवतो का? तुझ्यावर चोरीचाच गुन्हा दाखल करतो,’’ असं म्हणत मला मारहाण केली. त्यावर मी म्हणालो, ‘‘गाडी चोरली नाही. तेथे त्यांचे लोक बरेच होते, म्हणून घाबरून आम्ही जीव वाचविण्यासाठी पोलिस ठाण्यात आलो. गाडी चोरायची असती तर आम्ही पोलिस ठाण्यात आलो असतो का?’’, पण माझे त्यांनी काहीही न ऐकता मला खूप मारहाण केली. त्यांच्या हातातला आणि जिभेचा पट्टा एकाच वेळी चालत होता. एकीकडे ते मारत होते आणि दुसरीकडे ‘‘माझी नोकरी गेली असती तर तुला माझ्या गोठ्यात कामाला नेलं असतं,’’ असे बोलत राहिले. फलटणच्या एका पोलिसावर मगरचा राग असल्याने मला त्यांनी ‘कुणी विचारलं तू कुठला आहे, तर मी फलटणचा आहे, असे सांग’ असे दटावले. त्यानंतर मगरने इतर पोलिसांना मला मुद्दाम विचारायला लावले ‘तू कुठल्या गावाचा आहे. मी फलटणचा आहे असे सांगितले नाहीस, तर तुला पुन्हा मारीन’ अशी त्याची धमकी होती,’’ असेही साठे सांगतात.

‘‘मी मोबाईलवरून गुपचूप स्थानिक नगरसेवकाला फोन केला. ते पाहून मगरने ‘काय, माझे बोलणे रेकॉर्ड करतोयस का, तुला बघून घेतो,’अशी धमकी दिली. मी त्यांना फोन दाखवून नगरसेवकाला केलेला फोन दाखवला. नगरसेवक आल्यावर शेवटी पोलिसांनी मला सोडले,’’ असे साठे म्हणाले आणि त्यांनी प्रश्‍न विचारला, ‘‘आपल्यावरच्या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी पोलिसांकडे गेलेल्यांना अशी वागणूक देणे योग्य आहे का ? पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे कोणता पुणेकर तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे जाईल? मी आता आयुष्यात पोलिसांना फोन करणार नाही,’’

साठे यांच्या या प्रश्‍नाचे उत्तर ‘सकाळ’कडे नव्हते. पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे ते असेल का?

Web Title: Beating from the Police

व्हिडीओ गॅलरी