भीमाशंकर येथे भाविक, पर्यटकांच्या निवासाचा प्रश्‍न मार्गी  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

भीमाशंकर येथे बांधलेल्या भक्तनिवासचा प्रारंभ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या हस्ते झाला. त्यामुळे  भाविक व पर्यटकांचा निवासाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

मंचर (पुणे) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने श्रावण सोमवारचे (ता. 12) निमित्त साधून भीमाशंकर येथे बांधलेल्या भक्तनिवासचा प्रारंभ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या हस्ते झाला. त्यामुळे राज्यातील व परराज्यातील भाविक व पर्यटकांचा निवासाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

सर्व सोयींनी युक्त अशा या दुमजली पर्यटक निवासात तळमजल्यावर तीस डीलक्‍स रूम, तीन व्हीआयपी सूट, रेस्टॉरंट व पहिल्या मजल्यावर 48 डीलक्‍स रूम आहेत. या ठिकाणी आठ लोक राहतील असे हॉल आहेत. दोन कॉन्फरन्स हॉल प्रोजेक्‍टरसह सर्व सोयीसह उपलब्ध आहेत. प्रशस्त पार्किंग असून वाहनचालकांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था आहे. रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट शाकाहारी भोजनाची व्यवस्था आहे. परवडणाऱ्या दरामध्ये पर्यटक व भाविकांसाठी खोल्या उपलब्ध आहेत, अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली. 

या वेळी वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापिका क्षिप्रा बोरा, विश्वस्त सुनील देशमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते. भीमाशंकर पर्यटन निवास बुकिंगसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन हरणे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The beginning of Bhaktnivas at Bhimashankar