#Saathchal बेलवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा उत्साहात

राजकुमार थोरात 
रविवार, 15 जुलै 2018

वालचंदनगर : अश्‍व धावताच वायु वेगाने... रिंगण सोहळ्यामध्ये चैतन्य पसरले... बेलवाडी (ता.इंदापूर) येथे जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोळ्यातील पहिले गोल रिंगण उत्साहामध्ये पार पडले. आकाशामध्ये नभांनी केलेली झालेली गर्दी...रिंगण सोहळा पाहण्यासाठी झाली असल्याचे भासत होते.

वालचंदनगर : अश्‍व धावताच वायु वेगाने... रिंगण सोहळ्यामध्ये चैतन्य पसरले... बेलवाडी (ता.इंदापूर) येथे जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोळ्यातील पहिले गोल रिंगण उत्साहामध्ये पार पडले. आकाशामध्ये नभांनी केलेली झालेली गर्दी...रिंगण सोहळा पाहण्यासाठी झाली असल्याचे भासत होते.

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटपून रविवारी (ता.१५) सकाळी साडेसात वाजता बेलवाडीमध्ये रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाला. तोफांची सलामी देत पालखीचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. पालखी तळावर संत तुकाराम महारांजाचा पादुका ठेवून रिंगण सोहळ्याला सुरवात झाली. पताकावाल्याने देहभान विसरुन रिंगण सोहळ्याला पहिली फेरी मारली. उंच उंच पताका गगनाशी जणू स्पर्धाच करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. डोक्यावरती तुळस व पाण्याची कळशी घेवून महिलांनी रिंगण सोहळ्याला फेऱ्या मारुन देहू पासुन आलेले शिन घालवला. विणेकरी,टाळ-मृंदुग वालेही देहभान हरपून रिंगण सोहळ्यामध्ये धावत होते.

इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पालखी सोळ्यातील अश्‍वाचे पुजन करुन अश्‍वांच्या रिंगणला सुरवात झाली. वायु वेगाने अश्‍व धावू लागताच ग्यानबा तुकारामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. अश्‍वानांनी रिंगण साेहळ्याला तीन फेऱ्या मारुन रिंगण सोहळा पूर्ण केला. रिंगण पूर्ण होताच वैष्णवांनी विविध खेळ खेळण्यास सुरवात केली. फुगडी खेळण्यामध्ये पोलिस, वैष्णव, वारकरी दंग झाले होते. अनेक तरुण वारकऱ्यांनी उंचच्या उंच मनोरे करुन तुका झाला आकाशाएवढा दाखविले. पालखी सोहळा प्रमुख सुनिल महाराज  मोरे, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे, वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के.पिल्लई, इंदापूर पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप रिंगण सोहळ्यामध्ये फुगडी खेळण्यामध्ये दंग झाले होते.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या हिराबाई हरीभाऊ देसाई विद्यालयातील विद्यार्थी  विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभुषा करुन आले होते. त्यांनी लेझिमच्या तालावरती पालखीचे स्वागत केले. यावेळी नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार,विद्यामान संचालक सर्जेराव जामदार ,सरपंच माणिक जामदार, उपसरपंच स्वाती पवार, दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, अनिल खैरे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील,गटविकासधिकारी माणिकराव बिचकुले उपस्थित होते. 

Web Title: In the Belwadi, the first ringan celebration of Saint Tukaram Maharaj's Palqi Festival