सामूहिक जिद्दीने साकारले यशाचे ‘रिंगण’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

मैं अकेलाही चला था
जानिबे मंझील मगर
लोग साथ आते गये
कारवाँ बनता गया
‘मजरुह’च्या या ओळींची सार्थकता अगदीच पटते, ती युवा चित्रपटदिग्दर्शक मकरंद मानेचा आपल्या इप्सितापर्यंतचा प्रवास बघून! ‘रिंगण’ या त्याने दिग्दर्शित केलेल्या मराठी चित्रपटाने गतवर्षीच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा मान मिळवला. राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही ‘रिंगण’ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीच्या रजतकमलावर आपले नाव कोरले! अकलूजसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या, कलाक्षेत्राची घरातली कुठलीही पार्श्‍वभूमी नसताना या क्षेत्रात येऊन आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणातच मकरंदने मिळवलेले यश प्रेरणा देण्याबरोबरच वेगळी वाट दाखविणारेही आहे. या प्रवासात मकरंद आधी एकटाच होता; पण त्याच्या स्वतःवरच्या आणि त्याहीपेक्षा त्याच्या ‘कन्सेप्ट’वरच्या विश्‍वासामुळे एकेक सहकारी त्याला लाभत गेला. कार्यकारी निर्माता म्हणून तोवर बऱ्यापैकी स्थिरावलेला संजय दावरा त्याला भेटला आणि खऱ्याअर्थाने या ‘प्रोजेक्‍ट’ला सुरवात झाली. ‘अग्निहोत्र’ मालिकेच्या टीममध्ये सहायक दिग्दर्शक असतानाची त्यांची ओळख. संजयच्या दूरदर्शी नजरेला मकरंदच्या ‘रिंगण’मधले वेगळेपण नेमके दिसले. आत्महत्यांच्या बातम्यांच्या गर्दीत लढण्याची वेगळी सकारात्मक उमेद शेतकऱ्यांना मिळण्याची मकरंदला निकड वाटू लागली. ‘रिंगण’मधला भवताल मकरंदने स्वतः अनुभवलेला होता. निर्मितीचे कुठल्याही गणितातले बंधन नको, म्हणून संजयने या निर्मितीसाठी वेगळ्या प्रकारचा ‘सहकार’ साधण्याचा प्रयत्न केला.

अभिजित आपटे (छायालेखक), गणेश फुके (ध्वनिआरेखक) आणि सुचित्रा साठे (संकलक) हे तंत्रज्ञ मित्र या प्रकल्पाशी जोडले गेले. कमीत कमी खर्चात पण दर्जात कुठेही तडजोड न करता शूटिंग पूर्ण करण्यासाठीचे अर्थनियोजन केले गेले. निर्दोष नियोजनासाठी सहा महिने प्रत्येक बारीकसारीक बाबींचा अभ्यास केला गेला आणि त्याची बरहुकूम अंमलबजावणी झाली. शशांक शेंडे प्रमुख भूमिकेसाठी आला. त्याने सर्व प्रकारचे सहकार्य केले. कल्याणी मुळ्ये, सुहास शिरसाठ, उमेश जगताप, बालकलाकार तळेगावचा साहील जोशी... सगळ्याच कलावंतांनी आपल्यासह इतरांसाठीही जेवणाचे डबे आणले. अकलूज, पंढरपूर, सासवड आणि पुणे सगळीकडच्याच चित्रीकरणात अनेकांची मदत झाली. नैसर्गिक प्रकाशात, नेमक्‍या चित्रणस्थळांवरचे चित्रीकरण आणि त्याआधी कसून तालिमी या पद्धतीने खर्च अगदी आटोक्‍यात राहिला.

संजय आणि प्रमुख तंत्रज्ञांच्या ओळखींमधून माफक पैशात/ मोफत सामग्री येत होती. विठ्ठल पाटील, महेश येवले, गणेश फुके आदी मित्रांनी पैसेही टाकले. हा सगळा ‘सहकार’ कलाकृतीवरच्या विश्‍वासामुळे घडत गेला. अजय गोगावलेंनी गाणे विनाशुल्क गायले. संगीतकार रोहित नागभिडे, पार्श्‍वसंगीतकार गंधार, ‘डॉन’ स्टुडिओचे नरेंद्र भिडे सगळ्यांनीच साथ दिली. नेहमीच्या शंभरेक लोकांची कामे ‘मल्टिटास्किंग’ पद्धतीने चाळीस जणांनीच त्यातला आनंद घेत पूर्ण केली. ‘फ्युचर वर्क’सारख्या कॉर्पोरेटसनेही तरुणांच्या या जिद्दीवर विश्‍वास दाखवला. प्रसिद्ध फेस्टिव्हल क्‍युरेटर उमा डीकुन्हाने फिल्म जर्मनीच्या फेस्टिव्हलला पाठवली आणि मकरंद ‘रिंगण’साठी ‘डायरेक्‍टर व्हिजन ॲवॉर्ड’चा मानकरी ठरला!... पूर्ण वर्षभराची आखणी आणि पूर्वतयारी करून ‘रिंगण’ या उन्हाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय!

Web Title: best movie award to ringan movie