'खेड'मध्ये सापडली मोहाची सर्वोत्तम प्रजाती 

सम्राट कदम
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

-  आदिवासींसाठी कल्पवृक्ष असलेल्या 'मोहा'ची सर्वोत्तम प्रजाती खेड तालुक्‍यात सापडली आहे.
- नऊ जिल्ह्यांतील सर्वेक्षण आणि संशोधनानंतर सरासरी पेक्षा 13 टक्के अधिक स्निग्ध पदार्थांचे उत्पादन देणारी प्रजाती शोधण्यास संशोधकांना यश आले आहे.
-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. दिगंबर मोकाट आणि संशोधक विद्यार्थी योगेश सूर्यवंशी यांनी हे संशोधन केले आहे.
- या संबंधीचा शोधनिबंध 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मासिटीकल सायन्स अॅण्ड रिसर्च' या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला आहे. 

पुणे : आदिवासींसाठी कल्पवृक्ष असलेल्या 'मोहा'ची सर्वोत्तम प्रजाती खेड तालुक्‍यात सापडली आहे. नऊ जिल्ह्यांतील सर्वेक्षण आणि संशोधनानंतर सरासरी पेक्षा 13 टक्के अधिक स्निग्ध पदार्थांचे उत्पादन देणारी प्रजाती शोधण्यास संशोधकांना यश आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. दिगंबर मोकाट आणि संशोधक विद्यार्थी योगेश सूर्यवंशी यांनी हे संशोधन केले आहे. या संबंधीचा शोधनिबंध 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मासिटीकल सायन्स अॅण्ड रिसर्च' या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला आहे. 

राज्याच्या पश्‍चिम घाटातील मोहाच्या झाडांच्या प्रजातीचे प्रथमच सर्वेक्षण करण्यात आले आहे. डॉ. मोकाट म्हणाले, "आपल्याकडे मोहाच्या प्रमुख तीन प्रजाती आढळतात, त्यापैकी 'मधुका लॉजीफोलीया व्हरायटीना लॅटिफोलीया' या प्रजातीवर आम्ही लक्ष केंद्रित केले. नऊ जिल्ह्यांतील उत्कृष्ट दर्जाची 111 झाडे निवडण्यात आली. प्रयोगशाळेतील चाचण्यांनंतर आम्हाला खेड तालुक्‍यातील झाडात अधिक स्निग्ध पदार्थ मिळाले.'' सामान्यतः मोहापासून फुलांचे आणि बियांचे उत्पादन मिळण्यासाठी 8 ते 10 वर्षे लागतात, परंतु कलम केल्यास तीन वर्षातच उत्पादन घेणे शक्‍य होणार आहे. 

सूर्यवंशी म्हणाले,"मोहाच्या झाडासाठी कलमाची पद्धत विकसित केल्यामुळे, त्याची फळझाडांसारखी लागवड करता येणे शक्‍य आहे. यामुळे देशी झाडांच्या लागवडीतून बियांचे आणि फुलांचे उत्पादन घेणे शक्‍य झाले आहे. मोहापासून मिळणाऱ्या 'ओलिक अॅसिड'चा वापर जैवइंधनाच्या स्वरूपात करणे शक्‍य आहे.'' सुरवातीच्या टप्प्यात 300 कलमे विकसित करण्यात आली असून, पाच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवडीसाठी याचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्ष लागवडीमुळे प्रयोगशाळेत झालेल्या या संशोधनाचा उपयोग थेट शेतकऱ्यांना होत आहे. 

कसे संशोधन झाले? 
- चांगला घेर असलेले खोड आणि उत्तम दर्जाची फळे व फुलाचे उत्पादन देणारी 111 झाडे नऊ जिल्ह्यांतून निवडण्यात आली. 
- ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, पालघर आणि पुणे जिल्ह्यात प्रथमच सर्वेक्षण झाले. 
- प्रत्येक झाडाच्या फळाची आणि फुलाची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. 
- खेड येथील झाडाच्या फळापासून 58 टक्के तेल मिळाले. (साधारणपणे 45 टक्के तेल मिळते) 
- तेलामध्ये ओलिक अॅसिडचे प्रमाण सर्वाधिक. 
- पाचर पद्धतीने 300 कलमे करून प्रत्यक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांना देण्यात आली.
 

"मोहाच्या फुले आणि बियांपासून लाडू, बिस्किटे यांसह तेलाचे उत्पादन घेण्यात येते. आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या या झाडावरील संशोधनामुळे आदिवासींसह ग्रामीण शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनाचे नवीन साधन प्राप्त झाले आहे. खेड मध्ये सापडलेल्या या प्रजातीचे नामकरण विद्यापीठाच्या नावावरून 'सावित्री मोहा'असे करण्याचा आमचा विचार आहे.'' 
- प्रा. दिगंबर मोकाट, वनस्पतिशास्त्र विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The best species of Madhuca Indica found in Khed