#बेटी पढाव : ना बॅंक खाते...ना अनुदान

विश्‍वजित पवार
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जात असला तरी, तो कागदावरच राहात असल्याचे अनेकदा दिसून येते. शिक्षणासाठी ‘बेटी’ तयार असली तरी, ते मिळण्यासाठी तिला परिस्थितीपुढे हार पत्करण्याची वेळ येते. बिबवेवाडीतील सीताराम बिबवे शाळेत चौथीत शिकणाऱ्या पूनम वाघेलाची अशीच व्यथा आहे.

बॅंकेत खाते नसल्याने शैक्षणिक साहित्यासाठी मिळणाऱ्या अनुदानापासून पूनमला वंचित राहावे लागत आहे. सरकारच्या वतीने थेट लाभ हस्तांतरणाच्या (डीबीटी) माध्यमातून प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कपडे आणि शैक्षणिक साहित्यासाठी बॅंक खात्यात अनुदान दिले जाते. पूनमचे कुटुंबीय कामासाठी पुण्यात स्थलांतरित झाले आहे.

‘डीबीटी’द्वारे अनुदान बॅंक खात्यावरच मिळते. मात्र, या कुटुंबाकडे पुण्यातील रहिवासी पुरावा नसल्याने त्यांना बॅंकेत खाते काढणे शक्‍य नाही. परिणामी, पूनमला अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. 

पूनमची आई घरोघरी जाऊन तेलाचे डबे गोळा करते. पूनमही आईबरोबर सकाळी हे डबे गोळा करण्यासाठी जात असते. त्यानंतर दुपारी बारा वाजता शाळेत जाते. हातावर पोट असल्याने पूनमला आईला कामात मदत करावीच लागते. त्यावरच तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या तिच्या कुटुंबाचा या अनोळखी शहरात स्वतःचा राहण्याचा कायमचा पत्ता नाही. भाड्याच्या खोलीत हे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे आधार कार्डाव्यतिरिक्त कोणताच पुरावा नाही. त्यामुळे त्यांना बॅंकेत खाते काढता येत नाही. बिबवेवाडी भागात वास्तव्यास असल्याचे पत्र मागण्यासाठी पूनमची आई स्थानिक नगरसेवकांकडे गेली असता तेथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यांना तेथे कोणतीही मदत मिळाली नसल्याचे पूनमची आई सांगते. सरकार विद्यार्थ्यांना कपडे, बूट आणि शैक्षणिक साहित्यासाठी अनुदान देत असले तरी, ते मिळविण्याची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे पूनमसारख्या स्थलांतरित कुटुंबीयांच्या मुलांना या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे.

युनिफॉर्म, बूट यांसारख्या कोणत्याच गोष्टी शाळेतून मिळत नाहीत. शाळेकडून बॅंकेत खाते उघडा म्हणून सांगितले जात आहे. मात्र, आमच्याजवळ आधार कार्डशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे खाते उघडता येत नाही. 
- पूनमची आई

 बॅंकेत खाती नसलेल्या विद्यार्थ्यांची ‘डीबीटी’साठी शाळेमार्फत खाती उघडण्यात आली आहेत. काही दिवसांतच त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील.
 - शिवाजी दौंडकर,  प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग

Web Title: Beti Padavah No bank account no grant