कुंडात पुन्हा अवतरणार भागीरथी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

आळंदी - गेल्या २५ वर्षांपासून बंद पडलेल्या येथील भागीरथी कुंडातील गाळ काढून त्याला पुनरुज्जीवन देण्याचे काम सध्या स्वयंसेवी संस्थांकडून सुरू आहे. लोकसहभागातून हे काम सुरू असून त्यासाठी आतापर्यंत ८० हजार रुपये खर्च झाल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

आळंदी - गेल्या २५ वर्षांपासून बंद पडलेल्या येथील भागीरथी कुंडातील गाळ काढून त्याला पुनरुज्जीवन देण्याचे काम सध्या स्वयंसेवी संस्थांकडून सुरू आहे. लोकसहभागातून हे काम सुरू असून त्यासाठी आतापर्यंत ८० हजार रुपये खर्च झाल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

आळंदी नगरपालिका हद्दीत गावठाणातील भागीरथी कुंड गेल्या २५ वर्षांपासून दुरवस्थेत होते. स्थानिक धर्मशाळा, हॉटेल व्यावसायिकांनी शिल्लक अन्न, कचरा टाकल्याने तसेच नगरपालिकेनेही त्यात कचरा टाकल्याने भागीरथी कुंड पूर्णपणे नामशेष झाले होते. कुंडाच्या कडेच्या दगडी भिंतीही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या. दरम्यान पुण्यातील अखिल विश्व गायत्री परिषद, जलदेवता सेवा संघ, आळंदीतील इंद्रायणी नमामि  प्रतिष्ठान यांच्या वतीने या कुंडाची सफाई सुरू केली आहे. यात  जलदेवता सेवा संघाचे संचालक नरेंद्र पटेल, आळंदीचे उपनगराध्यक्ष सागर भोसले, अर्जुन मेदनकर, गणेश रहाणे यांनी कुंडाच्या सफाईसाठी विशेष परिश्रम घेतले. आठवडाभर सफाईसाठी तसेच कुंडातील राडारोडा, गाळ काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. सध्या कुंडातून सुमारे बारा टन गाळ बाहेर काढण्यात आला. 

परिसरातील नागरिक आणि वारकरी विद्यार्थी या कुंडातील पाण्याचा वापर १९९४ पर्यंत करत होते. मात्र, त्यानंतर कुंडाचा वापर बंद झाल्याने त्यात राडारोडा टाकणे सुरू झाल्याने त्यातील पाण्याचा साठा बंद झाला. सध्या कुंडातील गाळ काढल्यामुळे पाण्याचा साठा वाढला आहे. 

...तर पाण्याचा प्रश्‍न मार्गी
आळंदीत उन्हाळ्यात १९८७ ते १९९४ पर्यंत इंद्रायणी कोरडी पडली की टंचाईस्थिती निर्माण व्हायची. मात्र, प्रदक्षिणा रस्त्यावरील फ्रूटवाला धर्मशाळेची विहीर आणि कुंडांतील पाण्याचा आधार नागरिकांना होता. प्रदक्षिणा रस्त्यालगतच्या धर्मशाळांमध्ये विहिरी आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून त्यातील पाणी वापरात नाही, तर काही विहिरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आजही विहिरींचा पाणीसाठा उपयुक्त आहे. मात्र, धर्मशाळा, नगरपालिका, महसूल विभाग यांच्या दुर्लक्षामुळे विहिरी वापरात नाहीत. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या विहिरींवर जलशुद्धीकरणाची यंत्रणा बसविली तरी शहरातील पिण्याच्या पाण्याचा बहुतांशी प्रश्‍न मार्गी लागू शकतो. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. 

या गोष्टी होणार
आणखी आठवडाभर सफाई, डागडुजी 
सुशोभीकरणासाठी दगडी भिंत बांधून रंगरंगोटी 
कचरा टाकू नये यासाठी कुंडाला जाळी  
कुंडाच्या बाजूला देवतांचे पूजन 

Web Title: Bhagirathi kund alandi