भगवान वीर गोगादेव उत्सव जल्लोषात साजरा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

पुणे ः  वाल्मीक समाजाचे भगवान वीर गोगादेव उत्सव बागड खडकीत जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त खडकी बाजारातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जागोजागी मिरवणुकीतील निशाणाचे स्वागत करण्यात आले. या वेळी परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. 

 

पुणे ः  वाल्मीक समाजाचे भगवान वीर गोगादेव उत्सव बागड खडकीत जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त खडकी बाजारातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जागोजागी मिरवणुकीतील निशाणाचे स्वागत करण्यात आले. या वेळी परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. 

खडकी बाजारातील बस स्थानकाजवळ असलेल्या वाल्मीक समाजाच्या राम मंदिराला विद्युतरोषणाई करण्यात आली होती. गेला महिनाभर येथे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. वाल्मीक समाज (ब्रिगेड) पंचायतीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गाडीअड्डा येथील गोगादेव मेंढी येथे समाजबांधव खडकी, रेंजहिल, बोपखेल, पिंपळे गुरव, दापोडी, बोपोडी, साप्रस, औंध रोड येथून सहपरिवार पूजेसाठी एकत्र आले होते. सकाळपासूनच खडकीला जत्रेचे स्वरूप आले होते. सायंकाळी खडकी बाजारातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. 

विविध भागांतील आखाड्याचे भगत निशाण घेऊन मिरवणुकीत सामील झाले होते. निशाणाला फुलांची आकर्षक सजावट करून त्यावर विद्युतरोषणाई करण्यात आली होती. निशाणाच्या वरील भागात शंकर, साईबाबा, तिरुपती बालाजी यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. या प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. 

खडकीतील एमएसईबी चौकापासून मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. महात्मा गांधी चौकात कॉंग्रेस पक्षाचे खडकी ब्लॉक अध्यक्ष सेलवराज अँथोनी यांच्यातर्फे पाणी वाटप करण्यात आले. या वेळी पंकज सारसार, धर्मेश शहा आणि कार्यकर्त्यांनी निशाणाचे स्वागत केले. टेम्पो चौकात वंदे मातरम संघटनेच्या वतीने मिरवणुकीत सामील सर्व निशाणांचे श्रीफळ व निशाणाला फुलांची माळ टाकून स्वागत करण्यात आले. या वेळी संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, शिरीष रोच, राजाराम अगरवाल, अनिल सोनवणे, इक्‍बाल शेख, लहू राक्षे, सतीश बटेल्लू उपस्थित होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या दीपाली बिवाल, आशा आहेर, करुणा घाडगे, सुनीता आहेर, उमेश गवळी, योगेश गवळी, मोहन आहेर, तुळशीराम आहेर यांनी स्वागत केले. बहुजन पार्टीच्या वतीनेही स्वागत करण्यात आले. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे सदस्य मनीष आनंद व सदस्या पूजा आनंद यांनी आकर्षक स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सर्व निशाणांचे स्वागत केले. या वेळी प्रशांत गवळी, मयूर सावंत, बंडू शिंदे, गोपाळ वाघमारे, कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 
एमएसईबी चौकापासून सुरू झालेली मिरवणूक संपूर्ण बाजारातून जुन्या बाजारमार्गे राम मंदिरापासून गाडीअड्डा येथील वीर गोगादेव मेढी मंदिराजवळ समाप्त झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhagwan veer Gogadeo's festival celibrate in fervency