‘भामा आसखेड’चे काम पुन्हा खोळंबले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

शहराची तहान भागविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम येत्या जून महिन्यात पूर्ण होईल, असा दावा महापालिकेने केला होता. मात्र, नुकसानभरपाईवरून शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडल्याने ठेकेदाराने तेथून काढता पाय घेतला आहे.

पुणे - शहराची तहान भागविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम येत्या जून महिन्यात पूर्ण होईल, असा दावा महापालिकेने केला होता. मात्र, नुकसानभरपाईवरून शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडल्याने ठेकेदाराने तेथून काढता पाय घेतला आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर पावसाळ्यात हे काम होणे शक्‍य नसल्याने उर्वरित काम दिवाळीनंतर सुरू होऊन ते पूर्ण होण्यास आणखी दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्याच्या पूर्व भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी भामा आसखेड धरणातील २.६३ टीएमसी पाणी आणण्याचे नियोजन आहे. ते मार्च २०१७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले होते. त्यानंतर त्यांना इतर मार्गाने पाणी देण्याचे आश्‍वासन देऊन हे काम पुन्हा सुरू केले. आतापर्यंत या योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने ३८८ बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टर १५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. परंतु, या शेतकऱ्यांनी ‘आम्हाला पैसे नको, तर जमिनीच्या बदल्यात जमीन पाहिजे,’ अशी मागणी करीत हे काम पुन्हा बंद पाडले आहे.

पावसाळ्यात काम करणे अशक्‍य
उन्हाळ्यात धरणातील २० मीटर खोल पाण्यात स्फोट करणे सोपे होते. मात्र, पावसाळ्यात धरण भरले की पाण्याची पातळी ४० मीटर असते. एवढ्या पाण्यात हे काम करणे अशक्‍य असल्याने दिवाळीनंतरच येथे काम सुरू होईल. या योजनेचे काम पूर्ण होण्यास आणखी दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ठेकेदाराने ६ मार्चपासून भामा आसखेड योजनेचे काम बंद ठेवले आहे. नुकसानभरपाईबाबत आचारसंहितेत निर्णय घेता येणार नाही आणि पावसाळ्यात धरणात काम करता येणार नाही. यामुळे हे काम आता डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका

Web Title: Bhama Aaskhed Water Supply Scheme Work Stop