खेडसह शिरूर आणि दौंड तालुक्यांसाठी आनंदाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

सध्या सर्वांचे लक्ष लागेलेले भामा आसखेड धरण अखेर भरण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षीपेक्षा उशिरा का होईना धरण भरणार आहे.

आंबेठाण : सध्या सर्वांचे लक्ष लागेलेले भामा आसखेड धरण अखेर भरण्याच्या मार्गावर आहे.मागील वर्षीपेक्षा उशिरा का होईना धरण भरणार आहे. खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या भामा आसखेड धरणात सध्या (ता. १३) सकाळी सहा वाजेपर्यंत ९५.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा अत्यंत कमी असून मागील वर्षी आजच्या दिवशी धरण शंभर टक्के भरले होते.

यावर्षी धरण भरण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांसह या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शहरी भागातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. सुरुवातीला धरण भरणार की नाही याची नागरिकांना धास्ती वाटत होती परंतु पाऊस असाच सुरू राहिला तर धरण भरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बहुतांश चाकण एमआयडीसीसह चाकण शहर आणि तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील गावांसाठी याचा फायदा होणार आहे.

भामा आसखेड धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी आहे. खेडच्या पश्चिम भागात भामा आसखेड हे मातीचे धरण आहे.चालू वर्षी एक जून पासून धरण क्षेत्रात ८३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर काल दिवसभरात ५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

धरणात सध्या ७.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे तर जिवंत पाणीसाठा हा ७.३२ टीएमसी इतका आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौड या तीन तालुक्यांना होत असतो. त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांना वरदान ठरले आहे.
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhama Askhed dam filled up