पोलिस बंदोबस्तात भामा आसखेडला जलवाहिनीचे काम 

bhama
bhama

आंबेठाण (पुणे) : खेड तालुक्यातील आसखेड खुर्द येथे गेल्या अडीच वर्षांपासून थांबविलेले पुणे जलवाहिनीचे एक किलोमीटर लांबीचे काम मंगळवारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. 

या जलवाहिनीचे काम सोमवारी सुरू केले होते, परंतु शेतकऱ्यांनी अडविल्याने ते बंद करावे लागले. पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित असल्याने आतापर्यंत अनेक वेळा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जॅकवेल, जलवाहिनीची कामे बंद पाडली. त्यानंतर मागण्या मान्य होईपर्यंत एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बंद ठेवून अन्य कामे मार्गी लावण्याचे सर्वानुमते ठरले होते. परंतु आता सरकारने हे कामही सुरू केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. 

हे काम सुरू करताना मंगळवारी पोलिस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलिस आयुक्त राम जाधव, पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलिस दलाचे 2 अधिकारी, 66 कर्मचारी, शीघ्र कृती दलाचा 1 अधिकारी आणि 27 कर्मचारी, पिंपरी आयुक्तालयातील 7 अधिकारी, 60 कर्मचारी असे एकूण 10 अधिकारी आणि 153 कर्मचारी तैनात होते. तहसीलदार सुचित्रा आमले, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, तलाठी बंडू आवटे, पुणे महानगरपालिकेचे शाखा अभियंता मनोज गाठे, उपअभियंता निवृत्ती उतळे उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुरू असणाऱ्या रस्ता दुरुस्तीला अडचण होत असल्याने काम तत्काळ सुरू करण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर काम बंद ठेवण्याची जागा पुणे महापालिकेनेच सुचविली होती, तसे त्यांनी तीन वर्षांपूर्वी लेखी दिले होते, त्याचे आता काय झाले, असा सवाल शेतकरी विचारत आहे. 

रस्ता दुरुस्तीला अडचण होतेय, असे सांगणे म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का, असाही सवाल प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला. शेतकरी या कोरोना काळात घराबाहेर पडले आणि काही समस्या निर्माण झाली, तर सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com