Bharat Bandh : ‘भारत बंद’ला अल्प प्रतिसाद (व्हिडिओ )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी - पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसतर्फे पुकारलेल्या भारत बंदच्या दरम्यान विविध पक्षांनी केंद्र सरकारच्याविरोधात निदर्शने केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी - पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसतर्फे पुकारलेल्या भारत बंदच्या दरम्यान विविध पक्षांनी केंद्र सरकारच्याविरोधात निदर्शने केली.

पिंपरी - पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेससह अन्य पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला शहरात सोमवारी अल्प प्रतिसाद मिळाला. मोरवाडीतील ग्रेड सेपरेटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी तेरा जणांना ताब्यात घेतले. शहरातील पीएमपी बससेवा दुपारी विस्कळित झाली होती. दुकाने, हॉटेल आदींचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते. जनजीवनावर ‘बंद’चा फारसा परिणाम झाला नाही.

काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मनसे या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या पेट्रोल दरवाढीच्या निर्णयाविरोधात पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी सकाळी निदर्शने केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, कैलास कदम, मानव कांबळे, मारुती भापकर आदी यामध्ये सहभागी झाले होते. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त होता. पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड सेपरेटरमधून होणारी वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू होती. 

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोरवाडी चौकालगत ग्रेड सेपरेटरमध्ये थांबून रास्ता रोको आंदोलन केले. शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. महिला शहराध्यक्षा अश्‍विनी बांगर, अनिता पांचाळ; तसेच सीमा बेलापूरकर यांनी रस्ता रोखून धरल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ रोखून धरली. खराळवाडी येथेही काही कार्यकर्ते रस्त्यावर बसले होते. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर चौकात आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाट; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तेथील वाहतूक सुरळीत सुरू राहिली. चिंचवड गावात पीएमपीची बससेवा सुरळीत सुरू होती. परंतु, कात्रजहून चिंचवडकडे येणाऱ्या बस मात्र बंद होत्या. बस स्थानकावर सकाळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जनजीवन सुरळीत 
वल्लभनगर एसटी आगारात अन्य शहरांतून येणाऱ्या सर्व ५२ गाड्या दुपारपर्यंत पोचल्या. वल्लभनगरहून २५ गाड्या नेहमीप्रमाणे अन्य गावांना रवाना झाल्या. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसची सेवाही सुरळीत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले नाहीत. शाळांवर ‘बंद’चा परिणाम झाला नाही. भाजी मंडई, किराणा दुकाने सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com