Bharat Bandh : पुणे जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद (व्हिडिओ)

Bharat-Bandh
Bharat-Bandh

पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला.

जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही
जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीविरुद्ध पुकारलेल्या ‘बंद’ला आज जुन्नर तालुक्‍यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

‘बंद’मध्ये सर्वसामान्य व शेतकरी वर्गाचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी फारशी उत्सुकता दाखविली नाही. इंधन दरवाढीचा निषेध यापूर्वी निवेदन देऊन करण्यात आला आहे.

जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा येथील एसटी बससेवा सुरळीत सुरू होती. ‘बंद’मुळे काहींनी प्रवासाचे बेत रद्द केल्यामुळे तुलनेने कमी गर्दी जाणवत होती. व्यावसायिकांनी आज नेहमीप्रमाणे आपली दुकाने उघडली. दुकाने बंद ठेवण्याचे प्रमाण नगण्य होते. अत्यावश्‍यक सेवा व इतर सेवा सुरळीत सुरू असल्याचे दिसत होते. 

इंदापूर पॅटर्नचे स्वागत
इंदापूर - काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी ‘बंद’ला इंदापूर शहरात प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काँग्रेसच्या वतीने शहरात फक्त नऊ ते अकरा वाजेपर्यंत बंद पाळण्यात आला. 

काँग्रेसचे शहराध्यक्ष बापूराव जामदार, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, काँग्रेस गटनेते कैलास कदम, जावेद शेख, नितीन मखरे आदींनी ‘इंदापूर बंद’चे आवाहन केले होते. या ‘बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, शहराध्यक्ष अनिल राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अरबाज शेख, महिला शहराध्यक्ष उमा इंगुले, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, तालुकाध्यक्ष संतोष भिसे यांनी पाठिंबा दिला होता. या संदर्भात तहसीलदार कार्यालयास मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या ‘बंद’मधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.

शहरातले आजचे स्पीड पेट्रोलचे दर ९१.४५, साधे पेट्रोल ८८.६५; तर डिझेलचे दर ७६.६४ झाले. ते सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरचे आहेत. त्यामुळे दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी या ‘बंद’चे आयोजन करण्यात आले. या पद्धतीच्या ‘बंद’चे शहरातील व्यापाऱ्यांनी स्वागत केले. दरम्यान, शहर गेल्या अडीच महिन्यांत विविध कारणांमुळे नऊ वेळा ‘बंद’ राहिले.  

या संदर्भात कैलास कदम म्हणाले, ‘‘आजच्या ‘बंद’ला शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. त्यामुळे हा ‘बंद’ सर्वसमावेशक ठरला आहे. ‘इंदापूर बंद’चा आदर्श पॅटर्न संपूर्ण राज्याने स्वीकारावा.’’

महारुद्र पाटील म्हणाले, ‘‘इंधन दरवाढीच्या विरोधात आम्ही यापूर्वी तहसील कार्यालयापुढे आंदोलन करूनही त्याची दखल सरकारने घेतली नाही, त्यामुळे आम्ही या देशव्यापी ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे. या विषयावर आमच्या भावना तीव्र आहेत.’

खेड तहसीलवर मोर्चा
राजगुरुनगर - पेट्रोल, डिझेल व गॅसचे वाढलेले भाव कमी करावेत, या मागण्यांसाठी पुकारलेल्या ‘बंद’ला खेड तालुक्‍यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. खेड तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांच्यावतीने खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

या मोर्चाच्या समारोपानंतर माजी आमदार दिलीप मोहिते यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘सरकारने पेट्रोल व डिझेल, वीज, गॅस सिलिंडर, अन्नधान्य या रोजच्या गरजेच्या गोष्टींची भरमसाट दरवाढ करून ठेवली आहे. त्याचवेळी टोमॅटो, कांदा आदी शेतमालाला मात्र भाव नाही. नोटबंदी निर्णयामुळे उद्योगव्यवसाय बंद पडत चालले आहेत. सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य माणसाला जगणं नकोस झाले आहे. त्याला खरोखर वाईट दिवस आले आहेत.’’

या वेळी कैलास सांडभोर, विजय डोळस, समीर थिगळे, चंद्रकांत इंगवले, नीलेश कड, कैलास लिंभोरे, सुनील थिगळे, मनोज खांडेभराड, निर्मला पानसरे, संध्या जाधव, जया मोरे, डॉ. विजय गोकुळे, नवनाथ होले, विनायक घुमटकर, शांताराम सोनवणे, डी. डी. भोसले, राहुल नायकवडी, संग्राम सांडभोर, अनिल जाधव आदी उपस्थित होते. 

मोहिते म्हणाले, ‘‘आपला पंतप्रधान बडबड्या आहे. फेका मारणारा आहे. नुसता जाहिरातींवर जोर आहे. अमित शहा हे गुंड प्रवृत्तीचे आहे. पैसा, ईव्हीएम आणि ताकद या जोरावर सत्ता पादाक्रांत करीत आहेत. सरकारवर टीका करणारी शिवसेना ‘बंद’मध्ये का नाही? उद्धव ठाकरे यांची शेळी का झाली? अमित शहा यांना ठाकरे घाबरतात का? पोकळ डरकाळ्या फोडणारे ‘बंद’मध्ये सहभागी व्हायला पाहिजे होते. भाजपच्या भ्रष्टाचारात शिवसेना सहभागी असल्यामुळे ती ‘बंद’मध्ये सहभागी झाली नाही. खेड तालुक्‍यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने चाकणला एकीकडे पोलिसांना मारहाण होते, तर दुसरीकडे जुगारअड्डे लुटले जात आहेत.’

बारामतीत व्यवहार बंद
बारामती शहर - इंधन दरवाढीविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या देशव्यापी ‘बंद’ला आज बारामतीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार सुरू ठेवले होते. व्यापाऱ्यांच्या तीव्र भावना विचारात घेता नाराजी पत्करायला नको, यामुळे राजकीय पक्षांनीही कोणावरही दबाव आणला नाही. त्यामुळे ‘बंद’ शांततेत पार पडला. 

पेट्रोल डिझेलसह गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही दिवसांत झालेल्या भरमसाट वाढीच्या विरोधात काँग्रेसने देशव्यापी ‘बंद’चे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या बंदला पाठिंबा दिला. आज मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुधीर पाटसकर यांनी पाठिंबा असल्याचे जाहीर करत भिगवण चौकात दरवाढीविरोधात निदर्शने केली. आज सोमवारचा दिवस असल्याने व दोन दिवसांची सलग सुटी झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद न ठेवण्याचे ठरविले. दुसरीकडे काहींनी धोका पत्करायला नको, या भावनेने दुकाने बंद ठेवली. त्यामुळे ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील एसटी सेवा आज सुरळीत सुरू होती. कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. शहरातील सर्व अत्यावश्‍यक सेवा सुरळीत सुरू होत्या. 
दरम्यान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रशासनास निवेदन देत इंधन दरवाढीचा तीव्र निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com