#BharatBand पीएमपी, स्कूल बसवर दगडफेक (व्हिडिओ)

लक्ष्मी रस्ता - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोडागाडीतून प्रवास करत निषेध नोंदविला.
लक्ष्मी रस्ता - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोडागाडीतून प्रवास करत निषेध नोंदविला.

पुणे - सातत्याने वाढलेल्या इंधन दरवाढीविरोधात सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात हिंसक वळण लागले. बंदला पाठिंबा देत रस्त्यावर उतरलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पीएमपी बसवर तर उंड्री परिसरात स्कूल बसवर दगडफेक केली. सकाळी उघडलेली दुकाने व्यावसायिकांना बंद करायला लावली. शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

इंधन दरवाढीच्या मुद्यावर काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणले आहे. त्यातून ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. पेट्रोल पंप, दुकाने, बाजारपेठांमध्ये गर्दी कमी होती. तसेच, सकाळी आठ पीएमपी बसवर दगडफेक झाल्याने प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे जाणवत होते. 

सार्वजनिक वाहतूक सुरळीत
पीएमपीच्या आठ बसचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. रेल्वे, विमान आणि रिक्षा सेवा नियमित सुरू राहिली. एसटीच्या सेवेवर प्रवाशांअभावी काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे एसटी व्यवस्थापनाने काही फेऱ्या रद्द केल्या. पुणे-मुंबई टॅक्‍सी सेवा पूर्णपणे बंद ठेवली असली, तरी द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. शहरातील कॅब सेवा सुरू ठेवण्यात आली.

बहुतांश स्कूल बस सुरू
बंद असल्याने स्कूल व्हॅन सकाळी सुरू होत्या. मात्र, दुपारनंतर काही शाळांनी पालकांना दूरध्वनी करून शाळेच्या बस बंदमुळे येणार नसल्याचा निरोप पालकांना दिला. त्यामुळे काही शाळांच्या पालकांची गैरसोय झाली. 

बंदचे पडसाद
 पीएमपीच्या पाच बसच्या काचा फोडल्या. 
तीन बसची हवा सोडली
 एनआयबीएम रस्ता काही वेळेसाठी बंद
 काही पेट्रोल पंप संध्याकाळपर्यंत बंद होते.
 प्रमुख रस्त्यांवरील दुकाने बंद

राजकीय पक्ष रस्त्यावर
इंधन दरवाढीचा निषेध म्हणून काँग्रसने जाहीर केलेल्या बंदमध्ये भाजपविरोधी पक्ष सहभागी झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने लष्कर परिसरात खासदार सुप्रिया सुळे व रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, आबा बागूल, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, रवींद्र माळवदकर यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.  राष्ट्रवादी काँग्रेस आणि महिला आघाडीच्या वतीने विविध भागांत रस्ता रोको करण्यात आला. शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवकांनी आपापल्या भागात सरकारचा निषेध केला. कुमठेकर रस्त्यावर मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच, कोरेगाव पार्क आणि कोथरूडमध्ये मनसेचे नेते बाबू वागस्कर आणि किशोर शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह सरकारविरोधात आंदोलन केले. मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशिष साबळे यांनीही इंधन दरवाढीचा निषेध केला.

उंड्री परिसरात स्कूल बसचे नुकसान
उंड्रीमधील कॅलम हायस्कूलच्या बस विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सकाळी साडेसहाच्या सुमारास निघाल्या. बस थोडे अंतर गेल्यावर दुचाकीवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू केली आणि त्यात तीन बसच्या काचा फुटल्या. त्यानंतर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रमुखांनी घेतला. मात्र, या प्रकारामुळे उंड्रीतील आसपासच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या.

उंड्रीबरोबरच कोंढवा, कर्वेनगर, गोखलेनगर येथील काही शाळा, महाविद्यालये तसेच स्कूल बसदेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरातील अनेक भागात शाळा, महाविद्यालये सुरू होती; परंतु विद्यार्थ्यांची हजेरी मात्र तुलनेने कमी असल्याचे पाहायला मिळाले. ‘भारत बंद’च्या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यासंदर्भात शिक्षण विभागाने कोणतीही अधिकृत सूचना दिली नसल्याने शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता बहुतेक पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी आले होते. विशेषतः सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांमध्ये हे चित्र प्रकर्षाने दिसून आले.
 
शाळेच्या तीन बस फोडल्या, त्या वेळी त्यात चालक आणि एक महिला मदतनीस होत्या. सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. दगडफेकीनंतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्यात आली. त्यासाठी तातडीने पालकांना आणि शिक्षकांना कळविण्यात आले. विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत आलेल्या पालकांना घरी पाठविण्यात आले.
- मोनिका थदाणी, संचालक, कॅलम हायस्कूल 

शहरातील जवळपास १५ ते २० टक्के स्कूल बस, व्हॅन बंद ठेवल्या होत्या. काही ठिकाणी शाळा बंद असल्यामुळे तर काही चालकांनी स्वत:हून वाहने बंद ठेवली.
- संपत पाचरणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com