भाजप प्रवक्ते म्हणतात, 'नोटबंदीमुळे काळ पैसा बाळगणारे झाले हतबल'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

खोट्या नोटा सापडल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्धी माध्यमांव्दारे प्रसिद्धीत आल्या. नोटबंदीच्या निर्णयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे या संदर्भात अनेक संभ्रम आणि गुढता निर्माण झाली.

पुणे : नोटबंदीसारख्या धाडसी निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचेच केवळ धाबे दणाणले. नोटबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे होऊनही भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणारे काळा पैसाधारक हवालदिल आहेत. नोटबंदी हा राजकीय मुद्दा करून केवळ एकमेकांवर चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप पुरता मर्यादित नसून हा अतिशय गंभीर आणि व्यापक विषय आहे, असे मत  भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांनी व्यक्त केले. 

पत्रकार भवन येथे प्रा. विनायक आंबेकर लिखित 'नोटसम्राट-नोटबंदीची सुरसकथा' या कादंबरीचे प्रकाशन माधव भांडारी यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

- INDvBAN : बांगलादेशची दीडशतकी मजल; भारतीय गोलंदाजांची निष्प्रभता

यावेळी बोलताना माधव भांडारी म्हणाले की, 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुका ते 2014 च्या लोकसभा निवडणुका या मधल्या काळात नोटबंदीच्या निर्णयाची प्रस्तावना झाली. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी हा कालावधी सोडून दिला. याच दोन वर्षात पडद्यासमोर आणि पडद्यामागे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाला वळण देणाऱ्या अनेक घटना घडल्या. याच कालावधीत खोट्या नोटा सापडल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्धी माध्यमांव्दारे प्रसिद्धीत आल्या. नोटबंदीच्या निर्णयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे या संदर्भात अनेक संभ्रम आणि गुढता निर्माण झाली.

- चंद्रकात पाटलांनी केले शरद पवारांचे कौतुक 

बाजारपेठेतील खोट्या नोटांच्या सुळसुळाटामुळे अर्थकारणावर विपरीत परिणाम दिसू लागला आणि याचा अर्थतज्ज्ञांना वास आल्यानेच डावे-उजवे भेद विसरून सर्वानुमते अर्थतज्ज्ञांनी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करा, रद्द करा अशी मागणी केली. नोटाबंदीमुळे आर्थिक मंदी आली, हा सर्रास विपर्यास असून जागतिक स्तरावर झालेल्या घडामोडी त्यास मुख्यतः कारणीभूत आहेत.  नोटबंदी या निर्णयाचे यशापयश हे केवळ या तीन वर्षांच्या फूटपट्टीवर मापणे धारिष्ट्याचे होईल. त्यासाठी आगामी किमान 20 वर्षांचा कालावधी गृहित धरावा लागेल.

- Pune Rain : पाऊस ओसरणार; 'महा' चक्रीवादळाची तीव्रता झाली कमी!

नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अग्निपंख प्रकाशन आणि शुभम साहित्यतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते आणि नोटबंदीचे अभ्यासक विवेक खरे आणि लेखक प्रा. विनायक आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharatiya Janata Party spokesperson Madhav Bhandari comment about Demonitization