अभीष्टचिंतनाने नृत्यपरिक्रमा अमृतमय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे - भरतनाट्यम कलावंत सुचेता भिडे-चापेकर यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून, शाल पांघरून सत्तर दिव्यांनी त्यांचे औक्षण केले, तो क्षण पाहणाऱ्यांनाही भारावून टाकणारा होता. गुरू, शिष्या व रसिक त्या अभीष्टचिंतन सोहळ्यात एकरूप होऊन गेले होते. त्या प्रसन्न क्षणांची साठवण डोळ्यांत, मनात करत होते. 

पुणे - भरतनाट्यम कलावंत सुचेता भिडे-चापेकर यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून, शाल पांघरून सत्तर दिव्यांनी त्यांचे औक्षण केले, तो क्षण पाहणाऱ्यांनाही भारावून टाकणारा होता. गुरू, शिष्या व रसिक त्या अभीष्टचिंतन सोहळ्यात एकरूप होऊन गेले होते. त्या प्रसन्न क्षणांची साठवण डोळ्यांत, मनात करत होते. 

सुचेता भिडे-चापेकर यांचे एकाहत्तराव्या वर्षात पदार्पण, त्यांच्या ‘कलावर्धिनी’ संस्थेला ३० वर्षे पूर्ण व त्यांच्या शिष्यांनी ताईंच्या साठीप्रसंगी सुरू केलेल्या ‘परिक्रमा’ या वार्षिक नृत्य महोत्सवाची दशकपूर्ती असा त्रिवेणी संगम साधणारा हा सोहळा कलाक्षेत्रातील दिग्गजांच्या साक्षीने रंगत गेला. या वेळी पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘‘विश्‍वाची आर्तता सुचेताताईंच्या मनात साठलेली असल्याने त्यांची अभिव्यक्ती सहज होते. परंपरेला धक्का न लागू देता त्यांची स्वनिर्मिती हालचालींमधून दिसते.’’

आरंभी अमृता महाडिकने सुचेताताईंच्या कलाप्रवासावर केलेला ‘व्योमगामी’ हा माहितीपट दाखविला. सुचेताताईंच्या शिष्यास्मिता महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सुनील कोठारी व आशिष खोकर, सी. व्ही. चंद्रशेखर, दर्शना झवेरी, मधुर बजाज, राजीव सहस्रबुद्धे व माधव भट मंचावर उपस्थित होते. 

‘व्योमगामी’ या माहितीपटाची सीडी, सुचेताताईंनी मराठीत लिहिलेल्या ‘नृत्यात्मिका’ या पुस्तकाचे प्रीती पाटील यांनी केलेले इंग्रजी भाषांतर व नृत्यमुद्रांमधून पुण्यातील पर्यटनस्थळांचे दर्शन घडविणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी सुचेताताईंनी नृत्याभ्यासातील अनुभव, तंजावरच्या नृत्यशैलीबाबत केलेले संशोधन व त्याचा स्वत:च्या रचनांमध्ये केलेला मिलाफ, परंपरेला नवीन विचार व कल्पनांची जोड आदींची अवीट गोडी मोजक्‍या शब्दांत मांडली. पंचजाती अलारिपू, अभिनयदरू, पुरंदरदास यांच्या पदावर आधारित काफी रागातील ‘जगदोद्धारण’ या कानडी पदावरील नृत्यातून त्यांनी आध्यात्मिक भाव जागवला. ‘नृत्यगंगा’च्या सादरीकरणाने त्यांनी समारोप केला. गौरी स्वकुळ व विदुला हेमंत यांनी सूत्रसंचालन केले.

पुरस्काराची घोषणा
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे यंदाचा पुरस्कार सुचेता भिडे-चापेकर यांनी देणार असल्याची घोषणा मंगेशकर यांनी केली. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये येत्या २३ एप्रिलला गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

Web Title: Bharatnatyam Sucheta Bhide