पॉपच्या जमान्यात भारुडाचे ‘गारूड’

पवळेवाडी - येथील भारुडातील वगनाट्यात स्त्रीची भूमिका वटवताना श्रीराम कला पथकातील पुरुष कलाकार.
पवळेवाडी - येथील भारुडातील वगनाट्यात स्त्रीची भूमिका वटवताना श्रीराम कला पथकातील पुरुष कलाकार.

वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यातील पवळेवाडी या गावाने गेल्या पाच ते सहा पिढ्यांपासून संगीत भजनी भारुडाची कला जोपासली आहे. रिमिक्‍स आणि पॉप संगीताच्या जमान्यातही या भारूड पथकाने अनेक गावांना ‘गारूड’ घातले आहे. त्यामुळेच, यात्रांच्या हंगामामध्ये या पथकाला मोठी मागणी आहे. येथील तरुणांनी पुणे जिल्ह्यातील नामवंत भारूड पथक, असा गावाचा नावलौकिक कायम ठेवला आहे.

गावजत्रांमध्ये लोकनाट्य तमाशा, संगीत भजनी भारुडाचे कार्यक्रम ठेवले जातात. लोकनाट्याची बिदागी वाढल्याने छोट्या गावांना ती परवडत नसल्यामुळे तेथे संगीत भजनी भारुडाच्या पथकांना मागणी असते. पूर्वी अनेक गावांमध्ये भजनी भारूड पथके होती. परंतु, सध्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या गावांमध्येच ही पथके कार्यरत आहेत. त्यात प्रामुख्याने पवळेवाडी, ओझर्डे, सडवली, कल्हाट, कोंडिवडे, भोयरे, आढे येथील पथकांचा समावेश आहे.

पवळेवाडीतील काही कुटुंबांमध्ये खापर पणजोबांपासून नातवापर्यंत सर्वांनीच भारुडात काम केले आहे. येथील जवळपास प्रत्येक कुटुंबात वादक, गायक, भारूड कलाकार तयार झाले आहेत. शेती हा गावचा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय. येथील अनेक तरुणांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन फुलशेतीचा व्यवसाय सुरू केला आहे.

श्रीराम कला पथक मंडळ या नावाने येथील भारूड पथक कार्यरत आहे. गोपाळ पवळे हे पथकाचे अध्यक्ष, तर हरिभाऊ पवळे हे उपाध्यक्ष आहेत. दौंड येथील दादाभाऊ सय्यद हे सुमारे पंचवीस ते तीस वर्षांपासून या पथकासाठी वगनाट्य लिखाणाचे व विविध भूमिका साकारण्याचे काम करतात. यात सुमारे तीस ते पस्तीस कलाकार काम करतात. विशेष म्हणजे, यामध्ये एकही महिला कलाकार नाही. पथकातील पुरुषच स्त्रीची भूमिका साकारतात. पाच तास चालणाऱ्या या भारुडाची सुरुवात संतांच्या अभंगाने होते. गणेशस्तवन, गणगवळण, बतावणी, रंगबाजी व त्यानंतर वगनाट्याने भारुडाची समाप्ती होते. रामराज्य अर्थात सीतेचा वनवास, जेजुरीचा मल्हारी खंडेराया, सत्त्वशील राजा हरिश्‍चंद्र, संत ज्ञानेश्‍वर माझी माउली, कान्होपात्रा, संत तुकाराम महाराज ही या पथकाची गाजलेली वगनाट्ये आहेत. हे पथक अनेक सामाजिक वगनाट्येही सादर करते. त्यातून शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रूणहत्या, असे सामाजिक विषयही हाताळले जातात. संपूर्ण राज्यातून येथील पथकाला मागणी असते.

गणेशोत्सवापासून हंगामाला सुरुवात होते. गावजत्रा, पूजा, घरभरणी, शिवजयंती, हनुमान जयंती अशा सणांचे औचित्य साधून भारुडाचे कार्यक्रम ठेवले जातात. अक्षय तृतीयेपर्यंत गावोगावी प्रयोग केले जातात. अंतरानुसार ४५ ते ७० हजार रुपयांपर्यंत बिदागी घेतली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com