अग्निशामक दलातही भाऊबीज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

पुणे - दिवाळीतदेखील नागरिकांच्या संरक्षणार्थ भाऊबिजेपासून दूर असणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांचे औक्षण शहरातील अनेक भगिनींनी मंगळवारी केले. त्यामुळे दुर्घटनांपासून शहराचे संरक्षण करण्याचे बळ मिळाल्याची भावना जवानांनी व्यक्त केली.

भोई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे "अग्निशामक दलाच्या जवानांची भाऊबीज' हा उपक्रम दलाच्या मध्यवर्ती केंद्रात घेण्यात आला.

प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. या वेळी महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, ज्येष्ठ साहित्यिक प्रतिभा मोडक, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, गायक इक्‍बाल दरबार, शाहीर हेमंत मावळे, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, शिल्पकार विवेक खटावकर, अभिनेत्री जयमाला इनामदार, महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्‍वर मुळीक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई उपस्थित होते.

जगताप म्हणाले, 'अग्निशामक दलाची कामगिरी अभिमानास्पद आहे. महापालिकेच्या इतिहासात बचावकार्यात एकदाही अपयश नाही, हे दलाचे श्रेय आहे.

आर्थिक आणि कौटुंबिक ताण कामावर होऊ दिला नाही. त्यामुळे हे दल पुण्याचा मानबिंदू आहे.''

दैठणकर म्हणाले, 'मागील 20 वर्षांपासून जवानांच्या भाऊबिजेच्या उपक्रमाचे सातत्य राखणे अवघड आहे. घरातील दिवाळी सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा आनंद पोळीपेक्षा अधिक असतो.''

'जवान दिवाळीत तणावाखाली असतात. फटाक्‍यांमुळे शहरात बऱ्याच ठिकाणी आगीच्या घटना घडतात. गेल्या 20 वर्षांपासून भगिनी आम्हाला ओवाळतात. त्यामुळे या तीन दिवसातील ताण कमी होतो,'' असे रणपिसे यांनी सांगितले. मोडक यांनीही मनोगत व्यक्त केले. बालकलाकार वैष्णवी काळे हिने दिवाळीची खरेदी ही नाट्यछटा सादर करून उपस्थितांना हसविले. ऍड. प्रताप परदेशी यांनी आभार मानले.

नाकात नथ, नऊवारी साडी, हातात आरतीचे ताट आणि चेहऱ्यावर भाऊरायाला ओवाळण्याची उत्सुकता असलेल्या भगिनींच्या प्रेमाने भारावलेल्या जवानांच्या चेहऱ्यावर भाऊबिजेचा आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे गेले दोन-तीन दिवस ताण-तणावात घालविलेल्या जवानांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरला.

Web Title: bhaubeej in fire brigade scoud