आठवले सरांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

येरवडा - "शिकायची असेल शाळा...पालक आणि शिक्षकांचे आदेश पाळा,' "खेळायचे असेल तर खेळा; पण सोडू नका शाळा'...अशा मिस्कील शैलीत सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी विद्यार्थ्यांचा तास घेतला. याला विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 

येरवडा - "शिकायची असेल शाळा...पालक आणि शिक्षकांचे आदेश पाळा,' "खेळायचे असेल तर खेळा; पण सोडू नका शाळा'...अशा मिस्कील शैलीत सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी विद्यार्थ्यांचा तास घेतला. याला विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 

जेल रस्त्यावरील भाऊसाहेब जाधव मॉडेल स्कूलच्या उद्‌घाटनप्रसंगी आठवले बोलत होते. या वेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे, पी. ए. इनामदार, शिक्षण मंडळाचे सदस्य बाळासाहेब जानराव, शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुनंदा देवकर आदी उपस्थित होते. 
आठवले म्हणाले, ""बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला महत्त्व दिले होते. देशाला मजबूत करण्यासाठी आणि गरिबी हटविण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मुस्लिम समाजात शिक्षणाचे भरीव कार्य करण्याची गरज आहे.'' 

इनामदार म्हणाले, ""महापालिकेतील प्राथमिक शाळेत इंग्रजी संभाषण कौशल्य आणि संगणक शिक्षकांची नियुक्ती करण्याची आवश्‍यकता आहे. तरच गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण आणि आत्मविश्‍वास मिळेल.'' 

महापालिका शिक्षण मंडळाच्या बावीस शाळेत मॉडेल स्कूलची संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये ज्ञानरचनेवर आधारित शिक्षण असून, बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विज्ञानवादी शिक्षण देण्यात येणार असल्याचे जानराव यांनी सांगितले. 

विविध मागण्यांचे निवेदन 

लक्ष्मीनगर, श्रमिकनगर, मोझेनगर येथील मनीषा गवळी, छाया कसबे, सोजरबाई म्हस्के, दौलती जगताप, ज्युलिएट वानखेडे, सोजरबाई सुरवसे यांनी आठवले यांना निवेदन दिले. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अटी कमी कराव्यात, निराधार महिलांना 21 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध करून द्यावा, सर्व आर्थिक महामंडळामध्ये निधी उपलब्ध करावा, अशा मागण्यांचा समावेश असल्याचे सिफार संस्थेचे समन्वयक प्रमोद गोगावले यांनी सांगितले.

Web Title: bhausaheb jadhav model school inaugurated