...आणि सारे सहकारी शहीद झाले! 

सचिन बडे
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

माजी सैनिक भाऊसाहेब शेवाळे यांनी उलगडला भारत-पाक युद्धातील थरारपट 
पुणे - 'वरिष्ठ पातळीवर रणनिती आखण्यात आली. आम्हाला आदेश मिळताच आमच्या तुकडीने (पॅरा रेजिमेंट) ढाक्‍याला कूच केली. तीन किलोमीटर अलीकडेच आमची तुकडी उतरली. पूल ओलांडून आम्ही शहरात घुसणार तोच पाक सैन्यांच्या गोळ्यांचा वर्षाव आमच्यावर झाला. सारे सहकारी धारातिर्थी पडले. केवळ मी एकटाच बचावलो...'' 

सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील हा थरार सांगत होते, भारतीय लष्करातील पहिल्या "पॅरा रेजिमेंट' तुकडीतील हवालदार भाऊसाहेब ऊर्फ भिकू शेवाळे. फुरसुंगी येथील 72 वर्षीय भाऊसाहेब आजही तो थरारपट उलगडतात तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. 

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी "सकाळ'शी संवाद साधत युद्धातील प्रसंगाच्या आठवणी जागवल्या. या लढाईत शहीद झालेल्या सहकाऱ्यांवर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागल्याचे भाऊसाहेबांनी सांगितले. 

सन 1962 मधील भारत-चीन युद्धानंतर "पॅरा रेजिमेंट'चा प्रयोग भारतीय सैन्यात राबविण्यात आला. या तुकडीमध्ये भाऊसाहेब होते. पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यातील तणावातून भारतात येणारे निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी भारताला युद्धाचे पाऊल उचलावे लागले. लढाईत जमीनमार्गाने अनेक समस्या येत होत्या. त्यामुळे पॅरा रेजिमेंट तुकडीच्या मदतीने भारतीय सैन्याने ढाका शहरात प्रवेश केला. 

या लढाईत या तुकडीतील भाऊसाहेब वगळता सर्व जण शहीद झाले. शत्रूंच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत भाऊसाहेब अन्य तुकडीला मिळाले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून भारतीय सैन्याला शत्रूला खिंडीत गाठणे सोपे झाले. भाऊसाहेबांच्या या कामगिरीबद्दल त्यांना विशेष पदकाने गौरविण्यात आले होते. 

गोळ्या समोरून जात होत्या. शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. जखमी अवस्थेत पूल पार करून भारतीय सैन्याला पाकिस्तानी सैन्याची माहिती दिली. त्यामुळे भारतीय सैन्याला लढाई सोपी झाली. 
- भाऊसाहेब ऊर्फ भिकू शेवाळे, माजी सैनिक

Web Title: Bhausaheb Shewale Interview