भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाबाबत चर्चेतून तोडगा काढू - बोडके 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - ""गाळेधारक उच्च न्यायालयात गेल्यामुळे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होण्याची प्रक्रिया रखडली आहे. मात्र गाळेधारकांशी मानवतेच्या भावनेतून चर्चा करून या प्रश्‍नातून तोडगा काढण्यास प्राधान्य देऊ,'' असे आश्‍वासन स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिले. 

पुणे - ""गाळेधारक उच्च न्यायालयात गेल्यामुळे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होण्याची प्रक्रिया रखडली आहे. मात्र गाळेधारकांशी मानवतेच्या भावनेतून चर्चा करून या प्रश्‍नातून तोडगा काढण्यास प्राधान्य देऊ,'' असे आश्‍वासन स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिले. 

मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समितीतर्फे स्त्री शिक्षण गौरव दिन साजरा करण्यात आला. बोडके यांच्यातर्फे या वेळी वाड्यासमोरील गौरव  फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी समितीचे निमंत्रक नितीन पवार, महात्मा फुले समता परिषदेचे रवी चौधरी, महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या युवक आघाडीचे ओंकार मोरे, बांधकाम मजदूर सभेचे अध्यक्ष ऍड. मोहन वाडेकर, हमाल पंचायतीचे अर्जुन रणदिवे, काशिनाथ नखाते, विजय जगताप आदी उपस्थित होते. 

बोडके म्हणाले, ""महात्मा जोतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिडे वाड्यात सुरू केली. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी  अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. मात्र, या संदर्भात स्थानिक गाळेधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यामुळे भूसंपादनाचे काम दीर्घकाळ रखडले आहे. वाडाही धोकादायक स्थितीत उभा आहे. त्यामुळे लवकरच गाळेधारकांशी चर्चा करू.'' 

पवार म्हणाले, ""फुले दांपत्याच्या प्रयत्नाने मुलींसाठी पहिली शाळा सुरू होऊन भारतीय स्त्रीमुक्तीची पहाट झाली. म्हणूनच या जागेला राष्ट्रीय महत्त्व आहे. 

मात्र, सरकारला याची जाणीव नसावी ही खेदाची गोष्ट आहे. याच महिन्यात या जागेविषयी दाव्याची तारीख असून, त्यात स्मारकाचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि महापालिकेने करावा.'' 

प्रतिष्ठानच्या युवक आघाडीच्या वतीने शहरात मुलींसाठी सर्वत्र स्वतंत्र आणि मोफत अभ्यासिका सुरू करावी. त्यापैकी भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकात पूर्व भागातील मुलींसाठी अभ्यासिका सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन बोडके यांना देण्यात आले.

Web Title: Bhide wada discussions