Pune News: अंगणवाडी सेविकांचा बारामतीत रस्ता रोको आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune, baramati  aasha workers

Pune News: अंगणवाडी सेविकांचा बारामतीत रस्ता रोको आंदोलन

बारामती - राज्यव्यापी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात आज बारामतीतील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. आज येथील पंचायत समितीसमोर आपल्या विविध मागण्यांसाठी सेविकांनी काही काळ भिगवण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

मानधन नको वेतन द्या अशा प्रकारच्या घोषणा देत बारामती शहरातील भिगवण चौक, शारदा प्रांगण येथून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील विविध चौकातून बारामती पंचायत समिती समोर मोर्चा आला.

संतप्त अंगणवाडी सेविकांनी शासन व अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भिगवण रस्ता अडविला. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली. पंचायत समिती अधिकाऱ्यांनी पंचायत समिती समोर आंदोलन करण्यास विरोध केल्याने महिलांनी रास्ता रोको केला.

पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांची समजूत काढत रस्ता खुला केला. त्यानंतर या महिलांनी पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन केले. सुपरवायझर हे अंगणवाडी सेविकांच्या वयाचा मान न ठेवता वागतात, अनेक सेविकांना या दबावामुळे विविध व्याधी जडल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.