चासकमान धरणातून पाणी न सोडता भीमेला आला पूर

राजेंद्र सांडभोर
शनिवार, 27 जुलै 2019

- कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आला असून पुराने भीमा दुथडी भरून वाहत आहे.

- संपूर्ण खेड तालुक्यात आणि विशेषतः पश्चिम खेड तालुक्यात धुवाधार पाऊस सुरु असून सर्व नदी-नाले, ओढे, तुडूंब भरून वाहत आहेत. राजगुरूनगरचा केदारेश्वर बंधारा ओसंडून वाहू लागला आहे.

राजगुरूनगर : कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आला असून पुराने भीमा दुथडी भरून वाहत आहे. संपूर्ण खेड तालुक्यात आणि विशेषतः पश्चिम खेड तालुक्यात धुवाधार पाऊस सुरु असून सर्व नदी-नाले, ओढे, तुडूंब भरून वाहत आहेत. राजगुरूनगरचा केदारेश्वर बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. चासकमान धरणातून पाणी न सोडता भीमेला पूर येण्याचा प्रसंग गेल्या कित्येक वर्षांत घडला नव्हता, इतका तुफान पाउस धरणाखालच्या पट्ट्यात पडला आहे. 

खेड तालुक्यात आणि विशेषत: तालुक्याच्या पश्चिम भागात संततधार पाऊस पडत आहे. चासकमान धरणक्षेत्रात काल तब्बल ८८ मी.मी. पावसाची नोंद झाली असून आज दुपारी तीन वाजेपर्यंत ५० मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असल्याची माहिती चासकमानचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत असल्याने धरण ८४ टक्के भरले असून आज संध्याकाळी चासकमान धरणाचे दरवाजे उघडावे लागतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी  सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. चासकमानच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम भागात, विशेषतः डेहणे आणि कुडे खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. तसेच कळमोडी धरण भरून वाहत असल्याने त्या बाजूनेही धरणात चांगले पाणी येत आहे.  

भीमाशंकर येथे आज सकाळपर्यंतच्या २४ तासात तब्बल ३८० मी.मी. एवढ्या प्रचंड पावसाची नोंद झाली. भीमाशंकरबरोबरच खेडच्या पश्चिम डोंगरी भागात सर्वत्र साधारण २०० मी.मी च्या सरासरीने पाऊस कोसळला. त्यामुळे चासकमान धरणाची पाणीपातळी एक-दीड दिवसात ५७ टक्क्यांवरून थेट ८४ टक्क्यांवर गेली. 

राजगुरुनगरला काल ६० मी.मी. पावसाची नोंद झाली.

राजगुरुनगरचा केदारेश्वर बंधारा पूर्ण पाण्याखाली गेला असून बंधाऱ्याच्या आजूबाजूने पाणी वाहू लागले आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेने आणि पाटबंधारे प्रशासनाने बंधाऱ्याच्या लोखंडी फळ्या पावसाअगोदर काढणे गरजेचे होते त्या काढलेल्या नसल्याने बाजूचा रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhima flooded without releasing water from the Chsakaman dam