आरोपींकडून 25 हजार जीबी डेटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपींच्या लॅपटॉप व मोबाईलमधून 25 हजार जीबी डेटा पोलिसांनी जप्त केला आहे. सुधीर ढवळे, रोना विल्सन, शोमा सेन आणि महेश राऊत या चार जणांची पोलिस कोठडी संपल्याने 14 जूनला रिमांडसाठी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. त्या वेळी डेटा तपासायचा आहे, असे सरकारी पक्षाने सांगितले. मात्र, हा डेटा पोलिसांकडे एप्रिलपासून आहे. दोन महिन्यांत त्यात काही पुरावे सापडले का? या बचाव पक्षाच्या प्रश्नावर सरकारी पक्षाने काही भाष्य केले नाही. तसेच, तपासादरम्यान रोना विल्सन यांच्या घरी ऐंशी हजार रुपये आढळले होते. त्याचा वापर राष्ट्रविरोधी कारवायांसाठी होणार होता, अशी माहिती सरकारी पक्षाने दिली.

याबाबत काही पुरावे मिळाले का, अशी विचारणा बचाव पक्षाने केली. या प्रश्नावरही सरकारी पक्षाने काही भाष्य केले नाही.

पोलिस कारवाईत मारल्या गेलेल्या नवीनबाबूच्या स्मरणार्थ "जेएनयू'मध्ये एक व्याख्यान आयोजित करण्याचे आणि त्याला साहित्य पुरवण्याचे या चौघांचे नियोजन होते, अशी माहिती सरकारी पक्षाने दिली. यावर बचाव पक्षाने हा कार्यक्रम संशयास्पद आणि राष्ट्रविघातक
वाटला तर त्यावर एप्रिलमध्येच गुन्हा दाखल का नाही झाला, असा प्रश्न विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाबाबतच्या पत्रावरून गदारोळ झाला, त्याबाबत कोणताही उल्लेख न्यायालयात झाला नाही.
दरम्यान, ऍड. सुरेंद्र गडलिंग पोलिस कोठडीत असताना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. त्यांची अँजिओग्राफी झाल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.

जप्त डेटा 37 हजार सिनेमांएवढा....
पंचवीस हजार जीबी डेटा म्हणजे सुमारे सदतीस हजार सिनेमे बसतील इतका डेटा. पोलिसांनी आरोपींकडील लॅपटॉप, मोबाईलमधून तो 17 एप्रिलला जप्त केला होता. मात्र त्यात नेमके काय सापडले, याची माहिती अद्याप सरकारी पक्षाने दिली नाही.

Web Title: bhima koregaon Violence accused 25000 GB data seized crime