भीमाशंकरचे दोन लाख भाविकांकडून दर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

भीमाशंकर - श्रावण सरी झेलत दाट धुक्‍यात ‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या जयघोषात आज पहिल्या श्रावण सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर (ता. खेड) येथील पवित्र शिवलिंगाचे सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. एसटी बस स्थानकाच्या पुढे भीमाशंकर रस्त्यावर दर्शनरांग आली होती. सुमारे अडीच ते तीन तासांनंतर दर्शन होत होते.

भीमाशंकर - श्रावण सरी झेलत दाट धुक्‍यात ‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’च्या जयघोषात आज पहिल्या श्रावण सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर (ता. खेड) येथील पवित्र शिवलिंगाचे सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. एसटी बस स्थानकाच्या पुढे भीमाशंकर रस्त्यावर दर्शनरांग आली होती. सुमारे अडीच ते तीन तासांनंतर दर्शन होत होते.

श्रावणाचा पहिला दिवस रविवार आल्याने भीमाशंकर येथे पर्यटक व भाविकांनी रविवारीही दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवार आणि रविवारी सुमारे तीन लाख भाविक भीमाशंकरला आले होते. पहिल्याच सोमवारी आज भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. आज पहाटे ४ पासून भाविकांसाठी मंदिर खुले केले होते. वाढत्या गर्दीमुळे पोलिसांची मात्र दमछाक झाली. मंदिराजवळ कडक सुरक्षेत पोलिसांकडून बॅगांची तपासणी करण्यात येत होती. सहायक जिल्हाधिकारी (खेड) आयुष प्रसाद, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोपे, खेडच्या तहसीलदार अर्चना यादव, आंबेगावचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी यात्रा नियोजनाची व्यवस्था पाहिली. 

भाविकांना वाहनतळापासून २५ एसटी बसची सोय करण्यात आली होती. भीमाशंकर यात्रेसाठी जिल्ह्यातील इतर आगारातून ३२ जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले. यात्रेसाठी २४ पोलिस निरीक्षक व २०० पोलिस कर्मचारी नेमण्यात आले होते.

वन्यजीव विभागाचे १५ वनरक्षक, समितीचे २५ सदस्य वनक्षेत्र नाक्‍यापासून भीमाशंकरपर्यंत कचरा गोळा करण्यासाठी नेमले होते. आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाचे ४० कार्यकर्ते शनिवार दुपारपासून मंदिर परिसर व दर्शनबारीच्या पायऱ्या स्वच्छ करण्याचे काम करत होते. 

अमरनाथ सेवा मंडळाकडून भाविकांना मोफत खिचडी, केळी; तसेच चहावाटप करण्यात आला. विविध संस्थांकडून ठिकठिकाणी फराळ, जेवण ठेवण्यात आले होते.

दरम्यान, श्रावणात विशेषतः सुटीच्या दिवशी जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी भाविक व पर्यटकांमधून होत आहे. वाहनतळ जंगलात असल्याने पार्किंग ठिकाणी रात्रीची विजेचे व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

वाहन तपासणीवरून नाराजी
घोडेगाव, डिंभे व तळेघर येथे भाविकांच्या गाड्या अडवून पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. त्यात विशेषतः बाहेरील राज्यातील गाड्या अडविल्या जात आहेत, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. 

Web Title: Bhimashankar 2 lakh bhavik darshan