esakal | "भीमाशंकर'कडून उसाला भाव जाहीर; कामगारांना एवढा बोनस
sakal

बोलून बातमी शोधा

sugarcane1

-मागील हंगामासाठी अंतिम दर तीन हजार

-वीस टक्के बोनस मिळणार

"भीमाशंकर'कडून उसाला भाव जाहीर; कामगारांना एवढा बोनस

sakal_logo
By
सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव (पुणे) : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने 2018-19 मध्ये गाळप झालेल्या उसाला अंतिम दर प्रतिटन 3000 रुपये जाहीर केला आहे. याशिवाय कामगारांना 20 टक्के दिवाळी बोनस देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

कारखान्याच्या 23व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वळसे पाटील यांनी ही घोषणा केली. या वेळी किरण दिलीप वळसे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, मंगलदास बांदल, मानसिंग पाचुंदकर, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, सभापती उषा कानडे, शिरूरचे सभापती विश्वास कोहकडे, नीलेश थोरात, कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, अनिल वाळुंज, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, सर्व संचालक उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, ""गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसाला अंतिम दर प्रतिटन 3000 रुपये जाहीर केला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 2668 रुपये दिले असून, 40 रुपये भाग विकास निधी व 10 रुपये शिक्षण निधी कपात करून उर्वरित 282 रुपये 9 सप्टेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. "भीमाशंकर'ने या वर्षी पाच लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रतिदिन साडेचार हजार टन गाळप क्षमता सहा हजार टनांवर नेण्यासाठी विस्तारवाढ करण्यात येणार आहे. तसेच, इथेनॉलनिर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्‍त प्रदूषणविरहित डिस्टिलरी प्रकल्प उभारणार आहे.''

बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले की, कारखान्याने मागील हंगामात 180 दिवसांत 8 लाख 12 हजार 909 टन उसाचे गाळप करून सरासरी 11.85 टक्के साखर उतारा राखून 9 लाख 62 हजार 475 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सहवीजनिर्मितीतून 188 दिवसांत 6 कोटी 92 लाख 90 हजार युनिट वीजनिर्मिती केली आहे. कारखान्याचा वापर 2 कोटी 37 लाख 94 हजार युनिट वजा जाता 4 कोटी 54 लाख 95 हजार युनिट वीज वितरण कंपनीला विकल्याने सुमारे 29 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न कारखान्यास मिळाले आहे.

कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी अहवालाचे वाचन, तर डॉ. सुदाम खिलारी यांनी सूत्रसंचालन केले. संचालक ज्ञानेश्वर गावडे यांनी आभार मानले.


पूरग्रस्तांसाठी साडेपाच लाखांची मदत
कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी भीमाशंकर साखर कारखाना, भीमाशंकर शिक्षण संस्थेचे संचालक व कर्मचारी यांच्या वतीने पाच लाख 32 हजार रुपये मदत देण्यात आली आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

loading image
go to top