भीमाशंकर साखर कारखाना गाळप क्षमता वाढविणार

सुदाम बिडकर
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना इथेनॉल निर्मितीसाठी डीस्टलरीची उभारणी करणार असून केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. तसेच, दैनंदिन गाळप क्षमता साडेचार हजार टनांवरून सहा हजार टनांवर नेणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली. 

पारगाव (पुणे)  : ""भीमाशंकर सहकारी साखर कारखाना इथेनॉल निर्मितीसाठी डीस्टलरीची उभारणी करणार असून केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. तसेच, दैनंदिन गाळप क्षमता साडेचार हजार टनांवरून सहा हजार टनांवर नेणार आहे,'' अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली. 

दत्तात्रेयनगर-पारगाव (ता. आंबेगाव) येथे भीमाशंकर कारखान्याच्या 20व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजन वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी बॉयलर अग्निप्रदीपन संचालक अशोक घुले व त्यांच्या पत्नी अंजली यांच्या हस्ते आणि गव्हाण पूजन संचालक अण्णासाहेब पडवळ व त्यांच्या पत्नी शकुंतला यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, कारखान्याचे माजी अध्यक्ष व संचालक देवदत्त निकम, प्रदीप वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, सदाशिव पवार, केशर पवार, प्रकाश पवार, सभापती उषा कानडे, शिरूरचे सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, अरुणा थोरात, वर्षा शिवले, सुषमा शिंदे, पुष्पलता वामन जाधव, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, सर्व संचालक व वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व प्रवचनकार उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले. 

वळसे पाटील म्हणाले, ""भीमाशंकर कारखान्याने मागील गाळप हंगामात 180 दिवसांत 8 लाख 12 हजार 909 टन उसाचे गाळप करून 11.85 टक्के साखर उताऱ्याने 9 लाख 62 हजार 475 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सहविजनिर्मितीतून 188 दिवसांत 6 कोटी 92 लाख 90 हजार युनिट वीजनिर्मिती केली. कारखाना वापर वजा जाता 4 कोटी 54 लाख 95 हजार युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे. या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. अगोदर दुष्काळ व आता अतिवृष्टी, यामुळे उसाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध होणार आहे. कारखान्याने चालू हंगामासाठी साडेपाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. उसावर हुमणी व तांबेराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात. कारखाना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बरोबरीने ऊस विकास योजना राबवत आहे.'' 

नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. संचालक ज्ञानेश्वर गावडे यांनी आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhimashankar sugar factory will increase the capacity of silt