'कांबळे यांच्या लिखाणात अनुभवांचे निर्भीड चित्रण'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

दौंड -‘‘वेदना सहन करत अनुभवलेली प्रत्येक गोष्ट निर्भीडपणे मांडणारे उत्तम कांबळे यांनी व्रताप्रमाणे पत्रकारिता केली आहे,’’ असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी काढले.

दौंड -‘‘वेदना सहन करत अनुभवलेली प्रत्येक गोष्ट निर्भीडपणे मांडणारे उत्तम कांबळे यांनी व्रताप्रमाणे पत्रकारिता केली आहे,’’ असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी काढले.

दौंड शहरातील स्वर्गीय किसनदास कटारिया ट्रस्ट व रचना संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘भीमथडी सन्मान’ डॉ. पटेल यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, आमदार राहुल कुल, डॉ. लक्ष्मण बिडवे, भगवान निंबाळकर, प्रेमसुख कटारिया, किशोर मुनोत, बादशहा शेख उपस्थित होते. या वेळी बर्गे यांच्या हस्ते युवा पत्रकार हलिमा कुरेशी यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. डॉ. पटेल म्हणाले, ‘‘ठेचा खात पुढे जाताना आत्मक्‍लेष न करता प्रश्‍नाच्या मुळाशी जात उत्तम कांबळे यांनी पत्रकारिता केली.’’

‘‘पत्रकारिता व साहित्य लेखनासाठी मिळणारे सन्मान माझ्या आयुष्यावर व काळजावर झालेल्या जखमांचे व्रण बुजविण्याचे काम करतात, त्यामुळे ते महत्त्वाचे आहेत,’’ असे सांगून उत्तम कांबळे म्हणाले, ‘‘पत्रकारांनी ताकदवान लेखण्या व शब्द वापरले तर नवीन समाज उभा राहू शकतो. ज्यांना व्यवस्थेने नाकारले आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पत्रकार करू शकतात.’’ 

‘रचना’चे कार्यकारी प्रमुख राज काझी यांनी प्रास्ताविक केले. विकास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. उमेश जगदाळे यांनी आभार मानले. 

Web Title: Bhimthadi award