भिशी साम्राज्याला कोट्यवधींचा दणका

भिशी साम्राज्याला कोट्यवधींचा दणका

पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार चलनातून पाचशे व एक हजारांच्या नोटा बाद केल्याने वर्षानुवर्षे काळ्या पैशावर रोखीने व्यवहार करणाऱ्या उद्योजक, व्यापाऱ्यांच्या भिशी साम्राज्याला मोठा दणका बसला आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांची काळी माया पांढरी करण्यासाठी व्यावसायिकांची पळापळ सुरू असून, बाजारातील उलाढाल कमालीची मंदावली आहे, तर दुसरीकडे रकमा पांढऱ्या करण्याच्या उद्योगामुळे शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवू लागला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात लहान भिशीचे व्यावसायिकांचे हजारो गट कार्यरत आहेत. त्यांच्याकडून दहा हजारांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंत रकमेच्या भिशी लावल्या जातात. मासिक, पंधरा दिवस, आठवड्याच्या मुदतीचे भिशीचे प्रकार आहेत. त्यात "डेली कलेक्‍शन'चाही प्रकार आहे. विशेषत: पिंपरी, कॅम्प, चिंचवड, निगडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, कासारवाडी, काळेवाडी, कुदळवाडी, चिखली आदी भागातून बांधकाम व्यावसायिक, कापड, सोनेचांदीचे व्यापारी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर भिशी चालवितात. त्यामध्ये सिंधी, मारवाडी समाजातील तसेच दक्षिण व उत्तर भारतीय, बिहारी, राजस्थानी अशा हजारो व्यापारी, उद्योजकांचा सहभाग आहे. 

बॅंका, वित्तीय संस्थांच्या कागदपत्रांच्या त्रासापासून दूर राहून वेळेला झटपट पैसे उभे करण्याचा हुकमी मार्ग म्हणजे भिशी. येथे केवळ विश्‍वासावर काही तासांत कोट्यवधी रुपये उभे केले जातात व टॅक्‍सची भानगड नसल्याने व्यावसायिक या व्यवहाराला अधिक पसंती देतात. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये महिन्याला कोट्यवधींची उलाढाल यातून होते. जोखीम असूनही व्यवहार कागदावर नसल्याने जवळपास 70 टक्के काळा पैसा भिशीमध्ये गुंतलेला आहे. विशेषत: बोली (ऑक्‍शन) लावून भिशी चालविली जाते. काही व्यवहारांत भिशी उचलल्यावर तीन ते चार टक्के व्याज लावले जाते. यातून महिन्याकाठी काही कोटींचा काळा पैसा तयार होतो. सरकारच्या परवानगीशिवाय हा व्यवसाय आज बॅंकांसारखा समांतर चालविला जात आहे. 

उलाढाल साडेसातशे कोटींची 

शहरात विनानोंदणी भिशी चालविणाऱ्या अनेक संस्था आहेत. येथील एका संस्थेची वार्षिक उलाढाल साडेसातशे कोटींची आहे, तर स्थावर मालमत्ता जवळपास अडीचशे कोटींच्या घरात आहे. काही संस्थांनी भिशी बरोबरच चिटफंडचाही नोंदणीकृत उद्योग सुरू केला आहे. अशा संस्थांमधून बॅंकेप्रमाणे शेकडो कर्मचारी नियमित नोकरी करतात, यावरून भिशीच्या साम्राज्याची कल्पना येते. 

घरघर लागण्याची शक्‍यता 

पाचशे व एक हजारांच्या नोटा रद्द झाल्याने छोट्या व्यावसायिकांच्या कुवतीप्रमाणे त्यांना लाख-दोन लाख रुपये द्यायचे आणि शंभर रुपयाच्या स्वरूपात वीस-तीस टक्के कमी रक्कम पदरात पाडून पैसा पांढरा करायचा, असा फंडा या भिशी सम्राटांनी सर्रास सुरू केला आहे. मात्र, या निर्णयाने भिशी व्यवसायाला घरघर लागण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com