भोरसह 37 गावांचा वीजपुरवठा सुरू

ज्ञानेश्‍वर रायते
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

फलटण तालुक्‍यातील शिंदेवाडी उपकेंद्रातून 17 किलोमीटर अंतरावरील वीजवाहिनीद्वारे पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक कामे करण्यात आली. सुमारे दोन तासांनंतर भोर शहर तसेच भाटघर, सांगवी, वडगाव (डाळ), येवली आदींसह 13 गावांचा वीजपुरवठा सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू करण्यात आला; तसेच महापारेषणच्या कामथडी येथील उपकेंद्र व इतर उपकेंद्रांद्वारे पर्यायी व्यवस्थेतून आणखी 24 गावांचा वीजपुरवठा आज सकाळी सुरू करण्यात आला.

फलटणमधील शिंदेवाडी आणि कामथडी उपकेंद्रातून पर्यायी व्यवस्था

 

बारामती  ः भाटघर धरणालगतच्या महापारेषणच्या उपकेंद्रात पाणी शिरल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेला भोर शहरासह 37 गावांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरू करण्यात आला. दुसरीकडे, उपकेंद्रातून वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महानिर्मिती व महापारेषणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महावितरणच्या बारामती परिमंडलाच्या वतीने देण्यात आली.

भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना महापारेषणच्या 132/22 केव्ही उपकेंद्राच्या कंट्रोल रूममध्ये पाणी शिरल्याने भोर शहरासह 60 गावांचा वीजपुरवठा सोमवारी बंद करावा लागला होता. त्यानंतर महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यात फलटण तालुक्‍यातील शिंदेवाडी उपकेंद्रातून 17 किलोमीटर अंतरावरील वीजवाहिनीद्वारे पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक कामे करण्यात आली. सुमारे दोन तासांनंतर भोर शहर तसेच भाटघर, सांगवी, वडगाव (डाळ), येवली आदींसह 13 गावांचा वीजपुरवठा सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू करण्यात आला; तसेच महापारेषणच्या कामथडी येथील उपकेंद्र व इतर उपकेंद्रांद्वारे पर्यायी व्यवस्थेतून आणखी 24 गावांचा वीजपुरवठा आज सकाळी सुरू करण्यात आला.

सद्यःस्थितीत उपकेंद्राच्या कंट्रोल रूममधील पाण्याचा 64 केव्ही क्षमतेच्या जनित्रावरील मोठ्या पंपाद्वारे उपसा सुरू असून भोर नगरपालिकेच्या अग्निशमन दलानेही यात मदत केली. तालुक्‍यातील दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या उर्वरित वाड्या, वस्त्या व लहान गावांत पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhor city and 37 villages electricity supply regular