भोसरीतील कोंडीला वडमुखवाडीचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

पिंपरी - भोसरीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या मॅग्झीन कॉर्नर-आळंदी रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते. त्यातून मार्ग काढताना पादचारी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागते. या कोंडीवर पुणे-नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौक ते वडमुखवाडी रस्ता पर्याय ठरत आहे. 

पिंपरी - भोसरीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या मॅग्झीन कॉर्नर-आळंदी रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते. त्यातून मार्ग काढताना पादचारी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागते. या कोंडीवर पुणे-नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौक ते वडमुखवाडी रस्ता पर्याय ठरत आहे. 

भोसरीतील पीएमटी चौक ते आळंदी रस्त्यावरील बनाच्या ओढ्यापर्यंतचा मार्ग मुख्य बाजारपेठ आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला बहुमजली व्यापारी दालने आहेत. शिवाय रस्त्याच्या कडेला व पदपथावर फेरीवाले, हातगाडी, पथारीवाल्यांचीही दुकाने थाटलेली असतात. व्यापाऱ्यांची आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी केलेली असतात. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होते. तसेच, बनाच्या ओढ्याजवळील दोन मंगल कार्यालयांत येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी केली जातात. त्यांचाही अडथळा वाहतुकीस होतो. त्यातून मार्ग काढताना अन्य वाहनचालकांना कसरत करावी लागते.

पदपथांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पादचारी मुख्य रस्त्यावरून चालत असल्याने कोंडीत आणखी भर पडते. यावर पर्याय म्हणून मोशी-आळंदी रस्ता आहे. मात्र, अंतर जास्त असल्याने अनेकजण मॅग्झीन कॉर्नर रस्त्याचाच वापर करतात. आता मात्र, पर्यायी रस्त्या उपलब्ध झाला आहे.

तो म्हणजे पुणे-नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती चौक (पूर्वीचा वखार महामंडळ चौक) ते वडमुखवाडी रस्ता. हा रस्ता खाणींचा रस्ता म्हणूनही परिचित आहे. मात्र, पूर्वी खाणींपर्यंतच रस्ता होता. आता खाणींच्या दक्षिणेकडून वडमुखवाडीला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण केले आहे. रस्त्याच्या कडेला पथदिवे बसविले आहेत. अनेक गृहप्रकल्पांची कामे या रस्त्याच्या परिसरात सुरू आहेत. त्यामुळे पूर्वीचा सुनसान रस्ता आता रहदारीचा झाला आहे. हा रस्ता आळंदी-मॅग्झीन कॉर्नर रस्ता आणि मोशी-आळंदी रस्ता यांना समांतर असल्याने महत्त्वाचा ठरत आहे.

वडमुखवाडी रस्त्याचा फायदा
भोसरीतील वाहतूक कोंडीतून सुटका
आळंदी, चऱ्होलीला जाण्यासाठी सोयीचा
पुणे-आळंदी व स्पाइन रस्ता जोडलेला

कामासाठी मला दररोज आळंदीहून चिंचवडला यावे लागते. पूर्वी भोसरीमार्गे यायचो. ट्रॅफिक जाममुळे नकोसे वाटायचे. आता वडमुखवाडीतून सगळ्यात सोयीचा आणि जवळचा मार्ग झाला आहे. रस्त्याची देखभाल व दुरुस्ती त्वरित केली जाते. या रस्त्यामुळे घरी किंवा ऑफिसला पोचण्यासाठी वेळ कमी लागतो.
- गंगाधर गंगोत्री, विकास अधिकारी, एलआयसी 

Web Title: bhosari traffic vadmukhwadi road