लोणी काळभोर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

जनार्दन दांडगे
रविवार, 8 जुलै 2018

विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दिली.

लोणी काळभोर - जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन या मोठ्या ग्रामपंचायतींच्या विकास कामासाठी मागील तीन वर्षात कोट्यावधींचा निधी दिलेला आहे. यापुढील काळातही विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दिली.

लोणी काळभोर येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व समाजउपयोगी वस्तूंचे वाटप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या हस्ते शनिवारी (ता. ७) करण्यात आले. यावेळी शिवशक्ती भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुजाता पवार होत्या. यावेळी बोलताना त्यांनी वरील ग्वाही दिली. यावेळी माजी सभापती दिलीप काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, साधना बँकेचे संचालक सुभाष काळभोर, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, हेमलता बडेकर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार व पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर यांनी केले होते.

यावेळी रायवाडी येथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा (२० लाख), तरवडी-रानमळा येथील लक्ष्मीआई मंदिर सभामंडप उभारणे (सुमारे ४ लाख), वाघुलेवस्ती जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करून पेव्हिंग ब्लॉक बसविणे व वडाळे वस्ती जिल्हा परिषद शाळेसाठी संरक्षण भिंत उभारणे (प्रत्येकी साडेतीन लाख) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान २१ अंगणवाड्यांना खेळणी व सतरंज्या, सहा भजनी मंडळांना समाज प्रबोधन साहित्य वाटप, तीन दलित वस्त्यांना ग्रंथालय साहित्य, १०० मुलींना प्रत्येकी २ हजार रुपयांचे कन्यालक्ष्मी बचत योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात आले. कमलेश काळभोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
    
जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर कार्यरत असताना पूर्व हवेलीसाठी दहा कोटीहून अधिक रुपयांचा निधी दिला होता. ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी गावाचा शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवून विकास कामांचे नियोजन गरजेचे आहे. यापुढील काळातही विकास कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत कारभाऱ्यांना कायम सहकार्य करणार आहे. - प्रदिप कंद, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Bhumi Pujan of various development works at Loni Kalbhor