मोरवाडीमध्ये कल्याणकारी केंद्राचे भूमिपूजन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पिंपरी - दिव्यांगांसाठी महापालिकेने पेन्शन योजना सुरू केली असून, लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. त्याचा लाभ नि:समर्थ दिव्यांगांना होणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. 

पिंपरी - दिव्यांगांसाठी महापालिकेने पेन्शन योजना सुरू केली असून, लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. त्याचा लाभ नि:समर्थ दिव्यांगांना होणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. 

महापालिकेतर्फे मोरवाडी येथे नि:समर्थांसाठी (दिव्यांग) कल्याणकारी केंद्राचे भूमिपूजन गुरुवारी (ता. 3) काळजे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेविका मंगला कदम, केशव घोळवे, तुषार हिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थित होते. 

दिव्यांग केंद्रामध्ये तळमजल्यावर चारचाकी, दुचाकी व सायकल पार्किंग तसेच मुलांसाठी बाग व चौकीदार रूम असणार आहे. पहिल्या मजल्यावर 600 जणांसाठी मल्टीपर्पज हॉल, स्वागत कक्ष, कार्यालय, जॉईन टिचिंग स्टाफ रूम, स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह व आउटरीच रूमची सुविधा असेल. दुसऱ्या मजल्यावर अधिष्ठाता केबिन, बहुदिव्यांग क्‍लास रूम, गणित प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, ग्रंथालय, ब्रेन लिपी, संगीत रूम, व्यवसाय उपचार विभाग, चित्रकला वर्ग, हस्तकला, ई-लर्निंग कक्ष इत्यादी सुविधा असतील. तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर सुधार उद्देशक वर्ग, द्रुष्टी बाधित वर्ग, स्वमग्न वर्ग, बालवर्ग, टेलरिंग व ब्युटीशियन कोर्स वर्ग, व्यवसाय प्रशिक्षण श्रवण व वाचा, भौतिकोपचार व मानसोपचार विभाग आणि टेरेसवर पॅनल कव्हर इत्यादींची व्यवस्था असणार आहे. यासाठी आठ कोटींचा खर्च येणार आहे. कामाची निविदा मे. देव कन्स्ट्रक्‍शनला दिली असून 18 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Bhumi Pujan of Welfare Center in Morvadi