बिबवेवाडीत भरदिवसा सत्तावीस लाखांची लूट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

बिबवेवाडी - सातारा रस्त्यावरील पेट्रोल पंपाची रोकड घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनासमोर दुचाकी आडवी घालून अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर हत्याराचा धाक दाखवीत कर्मचाऱ्याकडील सत्तावीस लाख रुपयांची रोकड भरदिवसा लुटल्याची घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर सोमवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. ‘धूम’ या चित्रपटाप्रमाणे दुचाकीस्वारांनी टाकलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती.   

बिबवेवाडी - सातारा रस्त्यावरील पेट्रोल पंपाची रोकड घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनासमोर दुचाकी आडवी घालून अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर हत्याराचा धाक दाखवीत कर्मचाऱ्याकडील सत्तावीस लाख रुपयांची रोकड भरदिवसा लुटल्याची घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर सोमवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. ‘धूम’ या चित्रपटाप्रमाणे दुचाकीस्वारांनी टाकलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती.   

सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौकात नसरवान पेट्रोल सर्व्हिस स्टेशन आहे. दोन दिवसांच्या सुटीमुळे पंपाकडे जमा झालेली रोकड सोमवारी सकाळी बॅंकेत भरायची होती. त्यानुसार नसरवान पेट्रोल पंपावर पूर्वीपासून काम करणारे कर्मचारी बर्नाट दास अन्थोनी (वय ५४, रा. गलांडे चाळ, रामवाडी, नगर रस्ता) हे नेहमीप्रमाणे जमा झालेली रोकड बॅंक ऑफ इंडियाच्या भवानी पेठ शाखेत जमा करण्यासाठी साडेअकराच्या सुमारास वॅगनर कारमधून (एमएच १२, डीई ७०२३) निघाले होते. अन्थोनी हे कार चालवीत होते, तर दुसरे कर्मचारी अजय परदेशी हे पैशांची बॅग हातात घेऊन बसले होते. पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक गजानन पवार हे नेहमीप्रमाणे कारच्या पाठीमागे जात होते. 

कार बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील लाइटहाइस मॉलसमोर पोचली. त्या वेळी दुचाकीवरून अचानक आलेल्या एका चोरट्याने आपल्या दुचाकीने (सीबीझेड, एमएच १६, एआर ८४१२) कारच्या डाव्या बाजूला धडक देत कार दुभाजकाकडे दाबली. त्या वेळी जर्कीन परिधान केलेल्या चोरट्याने धारदार हत्याराने पैशांची बॅग हातात घेतलेल्या परदेशींच्या हातावर वार केला. त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून घेऊन त्याने पुढे थांबलेल्या काळ्या पल्सर दुचाकीवरून (पल्सर, एमएच ४२, ८३२८) गंगाधाम चौकाच्या दिशेने धूम ठोकली. याप्रकरणी अन्थोनी यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी 
दिवसाढवळ्या सत्तावीस लाखांची रोकड पळवून नेल्याची ही घटना कळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यामध्ये परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्यासह स्वारगेट, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, सहकारनगर पोलिस ठाण्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

घटनेनंतर वाहतूक कोंडी 
पावणेबाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने कशामुळे थांबली आहेत, याविषयी वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना माहिती न मिळाल्यामुळे विविध प्रकारची चर्चा सुरू झाली होती.

दीड महिन्यात दुसरी लूट
दीड महिन्यापूर्वी रविवार पेठेतील सोन्याच्या दुकानावरही भरदिवसा दरोडा टाकून २५ लाख रुपयांचे सोने चोरट्यांनी पळविले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांतच गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले होते. त्यानंतर २७ लाख रुपयांच्या चोरीची दुसरी मोठी घटना घडली आहे.

Web Title: bibvewadi pune news theft