बायफोकल, एचएसव्हीसीचे प्रवेश शून्य फेरीतच ऑनलाइन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

अकरावीचे द्विलक्ष्यी (बायफोकल) आणि व्यावसायिक (एचएसव्हीसी) अभ्यासक्रमाचे प्रवेश आता शून्य फेरीतच ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.

पुणे - अकरावीचे द्विलक्ष्यी (बायफोकल) आणि व्यावसायिक (एचएसव्हीसी) अभ्यासक्रमाचे प्रवेश आता शून्य फेरीतच ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. या फेरीत व्यवस्थापन, इनहाउस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांना या प्रवेशांसाठी एक फेरी करावी लागणार आहे. 

जून महिन्यात सुरू होणाऱ्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेसाठी शालेय शिक्षण विभागाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार द्विलक्ष्यी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहिल्यास, त्या प्रवेशाच्या नियमित फेऱ्यांद्वारे गुणवत्तेच्या आधारावर आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर भराव्या लागणार आहेत; तसेच त्याची माहिती प्रवेशाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागेल. 

शून्य फेरीत या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय मिळाले आणि त्यांनी प्रवेश घेतला, तर त्यांना पुढील फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येईल; पण प्रवेश घेतला नाही, तर त्यांना नियमित फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल. नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले, तर त्याला तेथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश घेतला नाही, तर पुढील फेऱ्यांमध्ये त्याला सहभागी होता येणार नाही. 

खेळाडूंसाठी प्राधान्यक्रम 
खेळाडूंना राखीव जागांवर प्रवेश देताना त्याचा प्राधान्यक्रम हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकविजेते खेळाडू, त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेले खेळाडू आणि नंतर राष्ट्रीय स्तरावरील पदकविजेते खेळाडू, असा राहील. अल्पसंख्याक आणि बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयांना व्यवस्थापन कोट्यातील पाच टक्के जागा शून्य फेरीपासून प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही टप्प्यावर भरता येतील. 

मराठा आरक्षण कायम राहणार 
मराठा मोर्चांनंतर राज्य सरकारने दिलेले सोळा टक्के सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाचे आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दिलेले दहा टक्के आरक्षण हे अकरावी प्रवेशावेळी कायम राहणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या आदेशात स्पष्ट केले आहे. केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतील 75 टक्के प्रवेश झाल्यानंतर महाविद्यालयांना शैक्षणिक कामकाज सुरू करता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bifocal HSVC access to zero round online