लोणावळा हाउसफुल्ल

लोणावळा हाउसफुल्ल

लोणावळ - लोणावळा, खंडाळ्यात सध्या मोसमी पावसाची संततधार सुरू आहे. सातत्याने सुरू असलेला हा पाऊस पर्यटकांना खुणावत असून, सध्या येथे पर्यटनासह वर्षाविहारासाठी  पर्यटकांची मोठी गर्दी होऊ  लागली आहे. रविवारी सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांची पावले वळल्याने लोणावळा पर्यटकांची हाउसफुल झाले. परिणामी, येथील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

पावसाचा आनंद लुटत वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांनी विशेषकरून लायन्स पॉइंट, खंडाळा येथील राजमाची पॉइंट, भुशी परिसरात गर्दी केली होती. दरम्यान पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीवर प्रचंड ताण आला होता. लोणावळा आंबवणे रस्त्यावर एअरफोर्स स्टेशन ते लोणावळा तलावापर्यंत वाहनांच्या सहा ते सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. पुणे-मुंबई महामार्गावर अपोलो गॅरेज ते मुनीर हॉटेलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील वाहतूकही संथगतीने सुरू होती. वाहने कोंडीत अडकून पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या मात्र नाकीनऊ आले होते. 

लोणावळ्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. लायन्स पॉइंट परिसरात धुक्‍याची दुलई पसरल्याने पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लायन्स पॉइंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच पर्यटक निसर्गाचा आनंद घेताना ‘झिंगाट’ झाल्याचे चित्र होते. मोटारीतील म्युझिक सिस्टिमचा दणदणाट, रस्त्यावरच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, हुक्का सेवन करत पर्यटनस्थळी उत्साही हुल्लडबाज तरुणाईमुळे कुटुंबवत्सल पर्यटकांना मात्र त्रास सहन करावा लागला.

पोलिसांची अडवणूक व चिरीमिरीची चर्चा
शनिवार व रविवार वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर भुशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळी वाहनांना मनाई करण्यात आली आहे. यामध्ये बसेस, अवजड वाहनांचा समावेश आहे. मात्र रविवारी सकाळी रायवूड पार्कजवळ बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून मोठ्या वाहनांची अडवणूक व चिरीमिरी घेत वाहने सोडण्यात येत असल्याची तक्रार काही वाहनचालकांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com