esakal | अखेर 'सकाळ'च्या पाठपुराव्याला यश; पुण्यातील दुकानांबाबत झाला मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर 'सकाळ'च्या पाठपुराव्याला यश; पुण्यातील दुकानांबाबत झाला मोठा निर्णय

-दुकाने आता सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडी राहणार

-'सकाळ'च्या वार्तांकनाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल

अखेर 'सकाळ'च्या पाठपुराव्याला यश; पुण्यातील दुकानांबाबत झाला मोठा निर्णय

sakal_logo
By
मंगेश कोळपकर

पुणे ः शहरातील दुकाने आता सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडी ठेवण्यास महापालिकेने अखेर परवानगी दिली आहे. गुरुवारपासून (ता.9 ) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. "सकाळ'ने या बाबत गेले दोन दिवस जोरदार पाठपुरावा केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याची दखल घेवून आदेश काढण्याचा आदेश दिला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही त्या बाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सायंकाळी आदेश प्रसिद्ध केला.

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

शहरात हॉटेल, मॉल आणि बार रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अन्य सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी सात वाजताच बंद करण्यास महापालिकेने सांगितले होते. त्यानुसार स्थानिक पोलिसांकडून दुकाने सायंकाळी सात वाजताच बंद करण्यास भाग पाडले जात होते. त्यामुळे ग्राहक आणि व्यापारी त्रस्त झाले होते. "सकाळ'ने या बाबत बुधवार (ता. 7), गुरुवारी (ता. 8) दोन दिवस वार्तांकन करून ग्राहक, व्यापारी यांना होणाऱ्या त्रासाकडे पुणेकरांचे लक्ष वेधले होते. त्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आणि कोरोनाच्या आढावा बैठकीदरम्यान या बाबतचे आदेश काढण्याची सूचना दिली. महापौर मोहोळ यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. तसेच शहराचे खासदार गिरीश बापट आणि सर्व आमदारांनी या बाबत उपमुख्यमंत्री पवार यांना दुकाने रात्री नऊपर्यंत उघडी ठेवण्याचा आदेश काढण्याची विनंती केली होती.

वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी

17 ऑक्‍टोबरपासून नवरात्र सुरू होत असून 25 ऑक्‍टोबर रोजी दसरा आहे. तर 14 नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत आहे. सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघ, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आदींनी केली होती. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनीही त्यासाठी आयुक्तांची भेट घेतली होती. सरकारला महसूल फक्त हॉटेल, बार आणि मॉलमधूनच मिळतो का, असा प्रश्‍नही संतप्त व्यापाऱ्यांनी उपस्थित केला होता. या पार्श्‍वभूमीवर विक्रमकुमार यांनी आदेश काढला आहे. महापालिकेच्या या आदेशामुळे शहरातील अर्थचक्राला आता गती मिळेल, अशी अपेक्षा लक्ष्मी रस्ता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राहुल बोरा यंनी व्यक्त केली आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)